तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
धर्म म्हणजे काही अपरिवर्तनीय नियमांचा संच नव्हे, तर समाजाला नैतिक दिशा देणारी आणि काळानुसार विकसित होत राहणारी जीवनव्यवस्था होय
स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक जडणघडणीवर ज्यांनी दूरगामी प्रभाव टाकला, त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्थान अग्रस्थानी आहे. वैदिक परंपरा आणि संस्कृतचा गाढा अभ्यास, आधुनिक विज्ञाननिष्ठ विचार, मानवतावादी दृष्टी आणि समाजसुधारणेची तळमळ यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विलक्षण मेळ होता. परंपरेचा त्याग न करता तिचा चिकित्सक अभ्यास करून तिला आधुनिक जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न त्यांनी आयुष्यभर केला. ‘धर्मकोशा’ची निर्मिती, ‘मराठी विश्वकोशा’ची उभारणी, ‘मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या स्थापनेतील योगदान, तसेच भारतीय संविधानाचे संस्कृत भाषांतर अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याने महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक विश्वाला नवी दिशा दिली.
लक्ष्मणचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात, पिंपळनेर या टुमदार गावात एका पारंपरिक वैदिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याचे वडील बाळाजी कृष्ण जोशी हे वेदशास्त्राचे अभ्यासक आणि धर्मनिष्ठ याज्ञिक होते, तर आईचे नाव राधाबाई. लक्ष्मण अवघा तीन वर्षांचा असतानाच राधाबाईंचे अकाली निधन झाले. आईची माया हरपल्यानंतर त्याची मोठी बहीण त्रिवेणी, म्हणजेच ‘माई’, हिने आईच्या मायेने त्याचा सांभाळ केला. बालपणापासूनच लक्ष्मणची बुद्धी तल्लख होती आणि ज्ञानाची ओढही होती. वडिलांकडून त्याला लहानपणीच वाचन-लेखनाचे प्राथमिक संस्कार मिळाले. अमरकोश, शिवलीलामृत, हरिविजय, संतांचे अभंग आणि विविध सुभाषितांचा परिचय त्याला बालवयातच झाला. मात्र, लक्ष्मणच्या आयुष्यातील हा मायेचा आधारही फार काळ टिकला नाही. वयाच्या नवव्या वर्षी कॉलऱ्याच्या साथीमध्ये माईचे निधन झाले. आईनंतर आईची माया देणारी बहीणही गेल्याने बाल लक्ष्मणच्या मनावर या दुःखाचा खोल ठसा उमटला.
लक्ष्मणची तल्लख बुद्धिमत्ता पाहून वडील बाळाजीपंतांनी त्याला पुढील शिक्षणासाठी हरिद्वारला पाठवण्याचा विचार केला. त्याच सुमारास पिंपळनेरच्या वनविभागात देवकुळे नावाचे वनाधिकारी रुजू झाले. बाळाजीपंतांशी त्यांची मैत्री झाली आणि एका चर्चेत लक्ष्मणच्या शिक्षणाचा विषय निघाला. हरिद्वारऐवजी त्याला वाई येथील प्राज्ञपाठशाळेत पाठवावे, असा सल्ला देवकुळे यांनी दिला. तेथील नारायणशास्त्री मराठे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देतात आणि त्यांची आपुलकीने काळजीही घेतात, असे त्यांनी सांगितले. बाळाजीपंतांना हा सल्ला मनापासून पटला.
अखेर फेब्रुवारी १९१४ मध्ये, अवघ्या तेराव्या वर्षी, लक्ष्मण वडिलांसोबत वाईला आला. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या प्राज्ञपाठशाळेचे संस्थापक स्वामी केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे) यांच्या भेटीसाठी तो गेला. गुरुजींना पाहताच लक्ष्मणने साष्टांग नमस्कार केला. त्यांच्या प्रसन्न आणि आश्वासक व्यक्तिमत्त्वाने लक्ष्मणच्या मनात गुरुजींविषयी विश्वास निर्माण झाला. याच भेटीपासून त्याच्या आयुष्यातील ज्ञानसाधनेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.
प्राज्ञपाठशाळेत स्वामी केवलानंदांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मणने अवघ्या तीन-चार वर्षांत संस्कृत व्याकरण, काव्य, कोश आणि षड्दर्शनांचा सखोल अभ्यास केला. शास्त्रार्थाच्या वेळी पूर्वपक्ष मांडणे, त्यातील युक्तिवाद तपासणे आणि त्याचे खंडन करणे यातील त्याची हातोटी पाहून स्वामीजी विशेष प्रभावित झाले.
शास्त्रांच्या पुढील अभ्यासासाठी १९१८ मध्ये, वयाच्या अठराव्या वर्षी, लक्ष्मण काशीकडे रवाना झाला. बिंदुमाधव घाटावरील मठात राहून त्याने पंडित वामाचरण भट्टाचार्य आणि काशीतील अन्य नामवंत पंडितांकडे न्यायशास्त्र आणि नव्यन्यायाचा सखोल अभ्यास केला. परिस्थिती प्रतिकूल होती, पण त्याची ज्ञानसाधना त्याने थांबू दिली नाही. अनेक अडचणींवर मात करत दिवस-रात्र त्याचा शास्त्रांचा अभ्यास सुरू राहिला.
या कठोर ज्ञानसाधनेचे फलित त्याला १९२२ मध्ये मिळाले. कलकत्ता येथील शासकीय संस्कृत विद्यापीठाची सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण होऊन अवघ्या एकविसाव्या वर्षी त्याने ‘तर्कतीर्थ’ ही सर्वोच्च पदवी संपादन केली. या यशामुळे देशभरातील विद्वत्वर्तुळात त्याचे नाव आदराने घेतले जाऊ लागले. पुढे ‘शास्त्रीजी’ आणि ‘तर्कतीर्थ’ या संबोधनांनीच ते सर्वपरिचित झाले.
पदवी मिळवल्यानंतर लक्ष्मण वाईच्या प्राज्ञपाठशाळेत शिक्षक म्हणून परतले. मात्र त्यांची ज्ञानाची भूक तिथेच थांबली नाही. याच काळात त्यांनी इंग्रजीचा सखोल अभ्यास केला आणि जॉन स्ट्युअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर यांसारख्या पाश्चात्त्य विचारवंतांचे लेखन वाचले. या सातत्यपूर्ण अध्ययनातून त्यांच्या विचारांना स्वतंत्र दिशा मिळत गेली आणि भारतीय शास्त्रपरंपरेत झालेल्या त्यांच्या जडणघडणीला पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि आधुनिक विचारांची व्यापक बैठक लाभली.
पारंपरिक शास्त्रांचे केवळ पाठांतर आणि सनातनी विचारसरणीतील कर्मकांड एवढ्यापुरते धर्माचे स्वरूप मर्यादित असू नये, असे त्यांना वाटू लागले. धर्म, समाज आणि परंपरा यांकडे चिकित्सक आणि विवेकनिष्ठ दृष्टीने पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. १९२३ मध्ये धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे भरलेल्या धर्मसभेत त्यांनी सनातनी पंडितांच्या कर्मठ भूमिकेला थेट आव्हान दिले. धर्मशास्त्रांचा आधार घेत त्यांनी रूढी आणि परंपरांचा चिकित्सक विचार मांडला. पुढेही अशा वादविवादात ते प्रथम विरोधकांचा पूर्वपक्ष प्रामाणिकपणे मांडत आणि त्यानंतर त्याचे तर्कशुद्ध खंडन करत. त्यामुळे मतभेद असूनही त्यांच्या पांडित्याचा आणि युक्तिवादाचा विरोधकांनाही आदर वाटत असे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील मुळ्हेर येथील वासुदेवबुवा पंडित यांच्या कन्या कावेरी यांच्याशी त्यांचा साध्या पद्धतीने विवाह झाला. विवाहानंतर त्या सत्यवतीबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
१९२९ मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या सनातनधर्म परिषदेत शास्त्रीजींनी अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नावर परखड भूमिका मांडली. दरम्यान शास्त्रीजींची महात्मा गांधींशी भेट झाली. गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन ते राष्ट्रीय चळवळीत सक्रिय झाले आणि कऱ्हाड येथे असहकार आंदोलनाचा प्रचार करू लागले. पुढे सविनय कायदेभंग आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना १९३० मध्ये सहा महिने आणि १९३२ मध्ये नऊ महिने असा दोनदा कारावास भोगावा लागला. १९३२ मधील धुळे तुरुंगवासाचा काळ त्यांच्या आयुष्यात केवळ कारावासाचा नव्हता; तो त्यांच्या वैचारिक जडणघडणीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. विनोबा भावे, जमनालाल बजाज, युसूफ मेहरअली आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांच्या सहवासामुळे त्यांच्या विचारविश्वाला अधिक व्यापक दिशा मिळाली. याच काळात त्यांनी कार्ल मार्क्सच्या कॅपिटलचा सखोल अभ्यास केला. प्राज्ञपाठशाळा
यानंतर ११ फेब्रुवारी १९३३ रोजी, येरवडा तुरुंगात महात्मा गांधींचे उपोषण सुरू असताना, गांधीजींच्या विनंतीवरून शास्त्रीजींनी सनातन्यांशी धर्मशास्त्राच्या आधारे वादविवाद केला. या चर्चेतून ‘अस्पृश्यता ही अधर्माची गोष्ट आहे’ असा धर्मशास्त्रीय जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यावर पहिली स्वाक्षरी शास्त्रीजींची होती. महात्मा गांधींचे पुत्र देवदास गांधी आणि सी. राजगोपालाचारी यांच्या कन्या लक्ष्मी यांचा आंतरजातीय विवाह झाला. या विवाहाचे पौरोहित्य करण्याचे धाडस शास्त्रीजींनी केले. त्या काळच्या सामाजिक वातावरणात हा निर्णय त्यांच्या सुधारणावादी भूमिकेचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारा होता.
गांधीजींच्या आध्यात्मिक राजकारणाच्या मर्यादा हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागल्या आणि त्यांच्या विचारांना अधिक वैज्ञानिक, भौतिकवादी आणि विवेकनिष्ठ दिशा मिळत गेली. १९३४ मध्ये त्यांनी ‘शुद्धिसर्वस्वम्’ हा ग्रंथ लिहिला. पुढे १९४१ मध्ये त्यांचे ‘हिंदुधर्माची समीक्षा’ आणि ‘जडवाद’ हे ग्रंथ प्रकाशित झाले. या लेखनातून त्यांच्या विचारांतील परिवर्तन अधिक स्पष्टपणे दिसून येते. धर्म आणि परंपरेकडे चिकित्सक दृष्टीने पाहणारा विवेकवाद त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू बनत गेला.
याच वैचारिक प्रवासात १९३७ मध्ये हुदली येथे भरलेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांची एम. एन. रॉय यांच्याशी भेट झाली. रॉय यांच्या नवमानवतावादी आणि विवेकनिष्ठ विचारांचा शास्त्रीजींवर खोल प्रभाव पडला. गांधीजींचा अहिंसावाद आणि काँग्रेसचे पारंपरिक राजकारण देशाच्या आर्थिक, वैज्ञानिक आणि बौद्धिक प्रगतीसाठी पुरेसे परिणामकारक नाही, असे त्यांना वाटू लागले. अखेर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन १९४० मध्ये स्थापन झालेल्या रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टीत प्रवेश केला.
रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टीच्या माध्यमातून शास्त्रीजींनी देशभर व्याख्याने, अभ्यासवर्ग आणि वैचारिक शिबिरांतून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादाचा प्रसार केला. मात्र, पुढे पक्षीय राजकारणाच्या मर्यादा त्यांनाही जाणवू लागल्या. डिसेंबर १९४८ मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या रॉयवादी पक्षाच्या अंतिम अधिवेशनाचे अध्यक्षपद शास्त्रीजींनी भूषवले. या अधिवेशनात त्यांनी पक्षाचे राजकीय अस्तित्व टिकवण्यापेक्षा व्यापक वैचारिक चळवळीच्या रूपाने काम करण्याची गरज मांडली आणि पक्ष विसर्जनाचा ठराव मांडला. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण लक्ष ‘रॅडिकल ह्युमॅनिझम’च्या वैचारिक प्रसाराकडे वळवले.
स्वतंत्र महाराष्ट्राची आणि नव्या भारताची उभारणी झाल्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी राष्ट्रीय आणि सांस्कृतिक जीवनाला दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे नेतृत्व केले. त्यांपैकी चार प्रकल्प विशेष उल्लेखनीय ठरतात.
सरदार वल्लभभाई पटेल आणि कन्हैयालाल मुंशी यांच्या आग्रहावरून उद्ध्वस्त सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची आणि प्राणप्रतिष्ठेची जबाबदारी वाईच्या प्राज्ञपाठशाळेकडे सोपवण्यात आली. मंदिराचे दरवाजे दलितांसह सर्व धर्मांच्या लोकांसाठी खुले असावेत या केंद्र सरकारच्या ठरावाला शास्त्रीजींची संपूर्ण मान्यता असल्याने त्यांच्याकडे हे काम सोपवण्यात आले. ११ मे १९५१ रोजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला आणि त्याचे प्रमुख ऋत्विजाचार्य म्हणून शास्त्रीजींनी पौरोहित्य केले. या सोहळ्यात मिळालेली दक्षिणा आणि मानधन त्यांनी स्वतःकडे न ठेवता निःस्पृहपणे सोमनाथ ट्रस्टला परत केले.
स्वतंत्र भारताचे संविधान स्वीकारल्यानंतर या सर्वोच्च कायद्याचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने शास्त्रीजींवर सोपवली. कायद्यातील क्लिष्ट संज्ञांना संस्कृतमध्ये नेमके रूप देण्याचे हे काम त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण केले. ‘भारतस्य संविधानम्’ १९५२ मध्ये वाईच्या प्राज्ञपाठशाळेच्या मुद्रणालयात छापण्यात आले.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्याच्या सांस्कृतिक विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९ नोव्हेंबर १९६० रोजी ‘साहित्य आणि संस्कृती मंडळा’ची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्षपद शास्त्रीजींकडे सोपवले. सलग वीस वर्षे, १९८० पर्यंत, त्यांनी मंडळाचे नेतृत्व केले. या काळात मंडळाने अनेक मौलिक ज्ञानग्रंथ प्रकाशित केले आणि ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ ही चरित्रमाला सुरू केली. तसेच प्लेटो, ॲरिस्टॉटल, रसेल, मिल आणि रुसो यांसारख्या विचारवंतांचे दोनशेहून अधिक जागतिक अभिजात ग्रंथ मराठीत अनुवादित करून घेतले.
मराठीला आधुनिक ज्ञानभाषेचे सामर्थ्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने शास्त्रीजींच्या मार्गदर्शनाखाली वाई येथे ‘मराठी विश्वकोशा’चे मुख्य कार्यालय उभे राहिले. सुरुवातीला वीस खंडांची योजना असलेल्या या प्रकल्पाचे स्वरूप पुढे विस्तारत गेले. अखेरीस पहिला परिचय खंड, अठरावा परिभाषा कोश आणि तेवीस मुख्य खंड अशा एकूण पंचवीस खंडांमध्ये हा ज्ञानकोश पूर्ण झाला. संगणक आणि इंटरनेटची साधने उपलब्ध नसलेल्या काळात वाईसारख्या छोट्या शहरातून जगभरातील ज्ञानाचे संकलन, संपादन आणि २५ खंडांत मांडणी करण्याचे हे काम शास्त्रीजींच्या ज्ञानदृष्टी, संघटनकौशल्य आणि चिकाटीचे प्रत्यंतर देणारे ठरले.
शास्त्रीजींच्या वैचारिक आणि साहित्यिक कार्याचा आवाका त्यांच्या ग्रंथसंपदेतून स्पष्टपणे दिसून येतो. ‘शुद्धिसर्वस्वम्’ (१९३४), ‘आनंदमीमांसा’ (१९३८), ‘हिंदुधर्माची समीक्षा’ आणि ‘जडवाद’ (१९४१), ‘ज्योति-निबंध’ (१९४७), ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ (१९५१), ‘राजवाडे लेखसंग्रह’ (१९६४), ‘लोकमान्य टिळक लेखसंग्रह’ (१९६९) आणि ‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धान्त’ (१९७३) हे त्यांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ होत. ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथाला १९५५ मध्ये पहिला मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
१९५४ मध्ये नवी दिल्ली येथे भरलेल्या ३७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शास्त्रीजींनी भूषवले. पुढे १९८१ मध्ये अमरावती येथे झालेल्या अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. या व्यासपीठावरून त्यांनी दलित साहित्य आणि चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारी भूमिका मांडली.
शास्त्रीजींच्या प्रदीर्घ आणि बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. भारत सरकारने १९७४ मध्ये त्यांना ‘संस्कृत पंडित’ हा सन्मान दिला. १९७७ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि १९९२ मध्ये देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. याशिवाय कोल्हापूर शाहू ट्रस्टचा ‘शाहू पुरस्कार’ही त्यांना मिळाला.
शास्त्रीजींच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या धर्मपत्नी सत्यवतीबाई, प्रेमाने ‘सतीकाकू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, यांचा वाटा मोलाचा होता. वाईच्या प्राज्ञपाठशाळेत येणाऱ्या असंख्य संशोधक आणि पाहुण्यांचे त्या आपुलकीने आदरातिथ्य करत. १९८८ मध्ये सत्यवतीबाईंचे निधन झाले. त्यानंतर शास्त्रीजी वैयक्तिक आयुष्यात काहीसे एकाकी झाले; पण त्यांच्या ज्ञानसाधनेत मात्र खंड पडला नाही.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि शास्त्रीजींचे नाते राजकारणाच्या पलीकडचे होते. समान ध्येय, विचार आणि परस्पर आदरातून त्यांच्यात घट्ट स्नेहबंध निर्माण झाला होता. जून १९८४ मध्ये वेणुताई चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर यशवंतराव खचून गेले होते. त्या कठीण काळात शास्त्रीजींनी त्यांना धीर दिला आणि आधार दिला. मात्र, २५ नोव्हेंबर १९८४ रोजी यशवंतरावांचे अचानक निधन झाले, तेव्हा शास्त्रीजींनाही हा धक्का फार खोलवर बसला. ८३ वर्षांचे शास्त्रीजी रात्रभर अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी कऱ्हाडच्या कृष्णाघाटावर जाऊन त्यांनी आपल्या जिवलग मित्राचे अंतःकरण भरून अंतिम दर्शन घेतले.
आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातही शास्त्रीजींचे चिंतन, लेखन आणि भ्रमण सुरूच होते. वयाची ९३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यांची ज्ञानसाधना थांबली नव्हती. अखेर २७ मे १९९४ रोजी महाबळेश्वर येथील ‘कृष्णदर्शन’ बंगल्यात कोणत्याही प्रदीर्घ आजारपणाविना त्यांचे शांतपणे निधन झाले. एका प्रदीर्घ ज्ञानयात्रेची तेथे अखेर झाली.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे जीवन म्हणजे भारतीय प्रबोधनाच्या इतिहासातील एक उज्ज्वल पर्व होय. त्यांनी परंपरेचा त्याग केला नाही; उलट चिकित्सकपणे अभ्यास करून तिच्यातील कालसुसंगत मूल्ये आधुनिक विचारांशी जोडली. शस्त्रांच्या बळावर नव्हे, तर शास्त्र आणि बुद्धिप्रामाण्याच्या आधारे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखवला.