तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
धर्म म्हणजे काही अपरिवर्तनीय नियमांचा संच नव्हे, तर समाजाला नैतिक दिशा देणारी आणि काळानुसार विकसित होत राहणारी जीवनव्यवस्था होय
चौदाव्या वर्षी वाईच्या प्राज्ञपाठशाळेत सुरू झालेली शास्त्रीजींची ज्ञानसाधना आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत अखंड सुरू राहिली. सनातनी धर्मशास्त्रांचा सखोल अभ्यास करणारा विद्यार्थी आणि भाष्यकार ते ‘जडवादा’चा स्वीकार करणारा आणि ‘मानवतावादा’चा पुरस्कार करणारा विचारवंत, हा त्यांचा वैचारिक प्रवास होता. या प्रदीर्घ प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘रॉयवाद’, म्हणजेच मानवेंद्रनाथ रॉय ऊर्फ एम. एन. रॉय यांचे तत्त्वज्ञान.
१९३७ च्या सुमारास शास्त्रीजींचा परिचय आधुनिक भारतातील प्रख्यात क्रांतिकारक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत एम. एन. रॉय यांच्याशी झाला. रॉय यांच्या नवमानवतावादी विचारसरणीचा शास्त्रीजींवर खोल प्रभाव पडला. त्यांना हळूहळू असे वाटू लागले की, गांधीजींचा अहिंसावाद आणि काँग्रेसचे पारंपरिक राजकारण देशाच्या आर्थिक, वैज्ञानिक आणि बौद्धिक प्रगतीस पुरेसे ठरत नाही. परिणामी त्यांची विचारधारा नवमानवतावादाकडे झुकू लागली आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनात एका नव्या वैचारिक पर्वाची सुरुवात झाली.
रॉयवाद
रॉयवादाची निर्मिती समजून घेण्यासाठी प्रथम एम. एन. रॉय यांच्या वादळी वैचारिक प्रवासाकडे पाहावे लागते. नरेंद्रनाथ भट्टाचार्य या नावाने जन्मलेल्या रॉय यांनी अवघ्या चौदाव्या वर्षापासून ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. बाघा जतीन यांच्या नेतृत्वाखाली भारतात सशस्त्र उठाव घडवून आणण्यासाठी जर्मनीकडून शस्त्रास्त्रांची मदत मिळवण्याचे त्यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांच्या निमित्ताने जावा, जपान, चीन, फिलीपिन्स आणि अखेरीस अमेरिकेपर्यंत त्यांचा प्रवास झाला.
मेक्सिकोतील वास्तव्यात त्यांच्या विचारांना समाजवादी दिशा मिळाली. त्यांनी मेक्सिकन समाजवादी पक्षाचे रूपांतर ‘मेक्सिकन कम्युनिस्ट पार्टी’मध्ये केले आणि ते जागतिक साम्यवादी चळवळीच्या केंद्रस्थानी पोहोचले. १९२० मध्ये मॉस्को येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट परिषदेत त्यांनी वसाहतवादी देशांतील क्रांतीच्या प्रश्नावर व्लादिमीर लेनिन यांच्याशी थेट चर्चा केली आणि स्वतःचा स्वतंत्र प्रबंध मांडला. मात्र, पुढे स्टॅलिनच्या काळात स्वतंत्र विचारांना आळा घातला जाऊ लागला आणि १९२९ मध्ये रॉय यांना कम्युनिस्ट इंटरनॅशनलमधून बाजूला करण्यात आले.
भारतामध्ये परतल्यानंतर रॉय यांना कारावास भोगावा लागला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सोव्हिएत रशियातील कम्युनिझमच्या नावाखाली निर्माण झालेली हुकूमशाही त्यांनी जवळून अनुभवली होती. या अनुभवातून त्यांचा मार्क्सवादावरील विश्वास ढळला आणि त्यांच्या विचारांना नवी दिशा मिळाली. साम्यवादाच्या पलीकडे जाऊन त्यांनी व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या नव्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली. त्याला ‘नवमानवतावाद’, ‘रॅडिकल ह्युमॅनिझम’ किंवा ‘रॉयवाद’ असे म्हटले गेले.
रॉयवादाच्या केंद्रस्थानी व्यक्ती आहे. देव, राष्ट्र, वर्ग किंवा राज्य यांसारख्या अमूर्त संकल्पनांना व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ स्थान देता कामा नये, ही त्यांची मूलभूत भूमिका होती. ग्रीक तत्त्वज्ञ प्रोटागोरसचे “Man is the measure of everything” हे सूत्र आणि कार्ल मार्क्सचे “Man is the root of mankind” हे विधान रॉयवादाच्या विचारविश्वाचा गाभा बनते. व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि तिचे हित हे सर्वोच्च मूल्य असले पाहिजे, असा रॉय यांचा आग्रह होता.
रॉय यांच्या मते मानवाची प्रगती केवळ आर्थिक नसते. स्वातंत्र्य आणि सत्याचा शोध या देखील मानवाच्या प्रेरक शक्ती आहेत. ‘सत्य हाच ज्ञानाचा आशय आहे’ यावर त्यांचा दृढ विश्वास होता. बुद्धी आणि इच्छाशक्तीच्या बळावर माणूस प्रतिकूल भौतिक परिस्थितीवर मात करू शकतो. त्यामुळे ‘व्यक्ती’ हा परिस्थितीचा केवळ निष्क्रिय परिणाम नसून इतिहास घडविणारा सक्रिय घटक आहे, ही भूमिका रॉयवादात महत्त्वाची ठरते.
रॉयवादात बुद्धिवादाला विशेष महत्त्व आहे. कोणतीही श्रद्धा, परंपरा किंवा विचार केवळ परंपरेने स्वीकारायचा नाही, तर त्याची चिकित्सा बुद्धीच्या कसोटीवर झाली पाहिजे. अंधश्रद्धा, पूर्वग्रह आणि अविवेकी अधिकारशाही यांच्यापासून मुक्त होणे ही मानवाची गरज आहे. विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील ज्ञान नव्हे, तर जीवनाकडे विवेकनिष्ठ दृष्टीने पाहण्याची पद्धत आहे.
रॉयवादात स्वातंत्र्य आणि नैतिकता यांचा जवळचा संबंध आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ बाह्य बंधनांपासून मुक्त होणे नव्हे; तर आपल्या बुद्धीने योग्य-अयोग्याचा निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता मिळवणे होय. मानवी नैतिकता ही केवळ धर्माच्या आदेशावर किंवा राज्याच्या कायद्यावर अवलंबून नसून मानवी विवेकातून विकसित झाली पाहिजे, अशी रॉय यांची भूमिका होती.
रॉयवादाची लोकशाहीची संकल्पनाही याच मानवी स्वातंत्र्यावर आधारलेली आहे. केवळ निवडणुका घेणे म्हणजे लोकशाही नव्हे. सत्ता काही मोजक्या लोकांच्या हातात केंद्रित झाली तर लोकशाहीचे बाह्य स्वरूप टिकले तरी तिचा आत्मा नष्ट होऊ शकतो. म्हणून रॉय यांनी ‘मूलभूत लोकशाही’ ही संकल्पना मांडली. सत्तेचे विकेंद्रीकरण करून गावागावांत लोकसमित्या स्थापन कराव्यात आणि लोकशाही खालून वर विकसित व्हावी, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर लोकशाही ‘आधी कळस, मग पाया’ अशी वरून लादलेली नसून ‘आधी पाया, मग कळस’ अशी खालून वर उभी राहणारी असली पाहिजे.
अर्थव्यवस्थेच्या बाबतीतही रॉयवादाचा केंद्रबिंदू व्यक्तीचे कल्याण हाच आहे. भांडवलशाहीत संपत्तीचे केंद्रीकरण होते, तर समाजवादी व्यवस्थेत आर्थिक सत्ता राज्याच्या हाती केंद्रित होण्याचा धोका असतो. या दोन्हींच्या पलीकडे रॉय यांनी सहकारी अर्थव्यवस्थेची कल्पना मांडली. अर्थव्यवस्थेचे अंतिम उद्दिष्ट केवळ उत्पादन किंवा संपत्तीची वाढ नसून प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे असावे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गरजा विकासाच्या केंद्रस्थानी असाव्यात, अशी त्यांची भूमिका होती.
अशा प्रकारे रॉयवादाच्या केंद्रस्थानी मानव, त्याची बुद्धी, स्वातंत्र्य, नैतिकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकशाही या परस्परांशी जोडलेल्या संकल्पना आहेत.
रॉयवाद आणि मार्क्सवाद
रॉयवाद समजून घेण्यासाठी त्याचा मार्क्सवादाशी असलेला संबंध आणि त्यापासून झालेली त्याची फारकत लक्षात घेणे आवश्यक आहे. रॉय स्वतः मार्क्सवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. त्यांनी मार्क्सवादाचा स्वीकार केला, त्याचा सखोल अभ्यास केला आणि आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय भूमिका बजावली. परंतु पुढे प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना मार्क्सवादाच्या मर्यादा जाणवू लागल्या. सोव्हिएत रशियातील केंद्रीकृत सत्ता आणि हुकूमशाहीचा अनुभव हा त्यातील महत्त्वाचा घटक होता. त्यातूनच त्यांनी मार्क्सवादाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही विचारसरणींमधील पहिला मूलभूत फरक परिवर्तनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आहे. मार्क्सवाद परिवर्तनामागे आर्थिक विकास, उत्पादन आणि वर्गसंघर्ष यांना प्रमुख मानतो. रॉय यांनी आर्थिक घटकांचे महत्त्व मान्य केले; परंतु मानवी चेतना, बुद्धी, इच्छाशक्ती आणि स्वातंत्र्य यांना दुय्यम मानणे त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या मते माणूस केवळ आर्थिक परिस्थितीचा परिणाम नसून इतिहास घडविणारा सक्रिय घटक आहे.
दुसरा फरक ‘व्यक्ती’ आणि ‘वर्ग’ यांच्या स्थानाबाबत आहे. मार्क्सवादात वर्ग हा सामाजिक विश्लेषणाचा प्रमुख आधार आहे. रॉयवादात मात्र व्यक्ती केंद्रस्थानी आहे. वर्गाच्या किंवा कोणत्याही सामूहिक ध्येयाच्या नावाखाली व्यक्तीचे स्वातंत्र्य चिरडले जाऊ नये, हा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे ‘मानव हाच सर्व गोष्टींचे परिमाण’ ही भूमिका रॉयवादाच्या केंद्रस्थानी येते.
तिसरा फरक राज्यसत्ता आणि लोकशाहीबाबत आहे. मार्क्सवादी क्रांतीच्या प्रक्रियेत कामगारवर्गाच्या हुकूमशाहीची संकल्पना पुढे आली. रॉय यांनी सोव्हिएत अनुभवातून केंद्रीकृत सत्तेचे धोके पाहिले. म्हणून त्यांनी ‘मूलभूत लोकशाही’ची कल्पना मांडली. सत्तेचे विकेंद्रीकरण, लोकसमित्यांचा सहभाग आणि खालून वर विकसित होणारी लोकशाही हे तिचे आधार होते.
चौथा फरक आर्थिक व्यवस्थेबाबत आहे. मार्क्सवाद भांडवलशाहीच्या जागी राज्यनियंत्रित अर्थव्यवस्थेचा आग्रह धरतो. रॉय यांनी मात्र राज्याच्या हातात आर्थिक सत्ता केंद्रीत होण्याचा धोका लक्षात घेऊन ‘सहकारी अर्थव्यवस्थे’ची कल्पना मांडली. अर्थव्यवस्थेचे अंतिम उद्दिष्ट राज्यसत्ता किंवा उत्पादनवाढ नसून मानवी गरजांची पूर्तता आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य हे असावे, अशी त्यांची भूमिका होती.
म्हणून रॉयवादाला केवळ ‘मार्क्सवादाचा नकार’ असे म्हणणे योग्य ठरणार नाही. रॉय यांनी मार्क्सवादातील आर्थिक विषमतेचे विश्लेषण आणि भौतिक वास्तवाचे महत्त्व स्वीकारले; पण त्याला मानवी स्वातंत्र्य आणि बुद्धिवादाची जोड देण्याचा प्रयत्न केला. मार्क्सवादाचा केंद्रबिंदू वर्गसंघर्षातून वर्गविहीन समाजाकडे जाणे हा असेल, तर रॉयवादाचा केंद्रबिंदू स्वतंत्र, विवेकनिष्ठ आणि नैतिक मानवाची निर्मिती हा होता.
शास्त्रीजी आणि रॉयवाद
शास्त्रीजींच्या वैचारिक प्रवासात गांधीवादानंतर रॉयवाद हा महत्त्वाचा टप्पा ठरला. एम. एन. रॉय यांच्याशी त्यांची पहिली भेट १९३७ मध्ये हुदली येथील एका मेळाव्यात झाली. या भेटीतून दोघांच्या वैचारिक सहप्रवासाला सुरुवात झाली. शास्त्रीजींनी भारतीय वैचारिक परंपरेचा सखोल अभ्यास, गांधीवादातून आलेली नैतिक जाणीव आणि स्वतःची स्वतंत्र बुद्धिवादी भूमिका यांच्या आधारे रॉयवादाचा स्वीकार केला.
एम. एन. रॉय यांच्या भौतिकवादी आणि विवेकनिष्ठ विचारांचा शास्त्रीजींच्या बुद्धिवादी मनावर खोल परिणाम झाला. आध्यात्मिक तत्त्वज्ञानापासून सुरू झालेली त्यांची वैचारिक वाटचाल हळूहळू जडवादाकडे वळली. या तात्त्विक मंथनातूनच १९४१ मध्ये त्यांचा ‘जडवाद’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. समाजमनात खोलवर रुजलेल्या चुकीच्या समजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वैचारिक चिकित्सा आवश्यक असते, अशी भूमिका त्यांनी मांडली. नव्या वैज्ञानिक विचारांची उभारणी करायची असेल, तर जुन्या समजुतींची समीक्षा करावी लागेल, हा त्यांच्या चिंतनाचा महत्त्वाचा आधार होता.
तथापि, शास्त्रीजींनी रॉयवादाचा स्वीकार अंधानुकरणातून केलेला नव्हता. त्यांनी रॉयवादातील बुद्धिवाद, मानवी स्वातंत्र्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला; पण त्याच वेळी गांधीजींच्या नैतिक मूल्यांबद्दल आणि सत्याग्रहाबद्दलचा त्यांचा आदर कायम राहिला. त्यामुळे त्यांच्या विचारांत गांधीवादातील नैतिकता आणि रॉयवादातील वैज्ञानिक मानवतावाद यांचा एक वेगळा संगम दिसून येतो. जडवाद आणि अध्यात्म यांच्यातील तात्त्विक संघर्षापलीकडे जाऊन, मानवी कल्याण हा दोन्ही प्रवाहांना जोडणारा समान धागा त्यांनी शोधला.
रॉय यांच्या मनातही शास्त्रीजींच्या बुद्धीचा मोठा आदर होता. पारंपरिक पाठशाळेत शिक्षण घेतलेला, वेद, उपनिषदे आणि धर्मशास्त्रांचा गाढा अभ्यासक असलेला हा विद्वान विचाराने मात्र आधुनिक, विवेकनिष्ठ आणि वैज्ञानिक होता. भारतीय परंपरेचे प्रगाढ ज्ञान असूनही तिचे अंधानुकरण न करता चिकित्सक दृष्टीने परीक्षण करण्याची त्यांची क्षमता रॉय यांना विशेष महत्त्वाची वाटत असे. म्हणूनच त्यांनी शास्त्रीजींचा गौरव “He was the best product of Indian Renaissance” या शब्दांत केला.
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर फॅसिस्ट शक्तींविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आणि गांधीजींनी आपल्या राजकीय धोरणाचा फेरविचार करावा, असे रॉय आणि शास्त्रीजी या दोघांनाही वाटत होते. गांधीजींचा अहिंसावाद आणि काँग्रेसचे पारंपरिक राजकारण देशाच्या आर्थिक, वैज्ञानिक आणि लोकशाही विकासासाठी पुरेसे परिणामकारक ठरत नाही, असे शास्त्रीजींना वाटू लागले. त्याचबरोबर रॉय यांचा विवेकनिष्ठ, आधुनिक आणि फॅसिझमविरोधी दृष्टिकोन त्यांना अधिक वास्तववादी वाटला.
याच विचारांमुळे त्यांनी काँग्रेसपासून दूर जात रॉय यांच्या नेतृत्वाखालील ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक पार्टी’च्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १९४० मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाच्या उभारणीत शास्त्रीजींचा महत्त्वाचा वाटा होता. पक्षाचा जाहीरनामा आणि वैचारिक भूमिका निश्चित करण्याबरोबरच महाराष्ट्रात, विशेषतः सातारा आणि ग्रामीण भागात, रॉयवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी व्यापक काम केले.
रॅडिकल डेमॉक्रॅटिक पक्षाने कामगार, शेतमजूर, शेतकरी आणि तरुण यांच्या प्रश्नांना आपल्या कार्याच्या केंद्रस्थानी ठेवले. देशभर पक्षाच्या शाखा स्थापन करण्यात आल्या आणि अभ्यासवर्ग तसेच शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये शास्त्रीजींसह मणिबेन आणि प्रा. गोवर्धन पारीख यांसारखे नेते प्रमुख वक्ते असत. त्यांच्या व्याख्यानांना शेतकरी, शिक्षक आणि तरुण विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असे. १९४६ च्या निवडणुकीत शास्त्रीजींनी सातारा विभागात रॅडिकल डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार विठ्ठलराव जगताप यांच्या प्रचारासाठी व्यापक दौरेही केले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र रॉयवादी विचारांत आणखी एक महत्त्वाचे परिवर्तन घडू लागले. भारतासारख्या अज्ञान, दारिद्र्य आणि निरक्षरतेने ग्रस्त समाजात केवळ संसदीय आणि पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून खरी लोकशाही रुजणार नाही, अशी रॉय आणि शास्त्रीजींची भूमिका बनत गेली. निवडणुकीतील मतांच्या गणितासाठी धार्मिक भावना, जातीय निष्ठा आणि अंधश्रद्धांचा वापर होऊन लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाच बाधा येण्याचा धोका त्यांना दिसत होता. पक्षीय राजकारण अनेकदा सत्तास्पर्धेपुरते मर्यादित राहते, तर लोकशाहीच्या यशासाठी सुशिक्षित, विवेकशील आणि स्वातंत्र्यप्रिय नागरिक घडविणे अधिक महत्त्वाचे आहे, असा त्यांचा आग्रह होता.
या जाणिवेतून रॅडिकल डेमॉक्रॅटिक पक्षाला केवळ राजकीय पक्ष म्हणून टिकवून ठेवण्याऐवजी त्याचे रूपांतर व्यापक वैचारिक चळवळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर १९४८ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या रॉयवाद्यांच्या ऐतिहासिक अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनाचे अध्यक्षपद शास्त्रीजींनी भूषवले होते. पक्षस्थापनेनंतर अवघ्या आठ वर्षांत पक्षविसर्जनाचा ठराव मांडण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली आणि त्यांनी ती स्वीकारली.
अध्यक्षीय भाषणात शास्त्रीजींनी स्वतंत्र भारतातील लोकशाहीची दिशा स्पष्ट केली. राजकीय पक्षाच्या माध्यमातून सत्ता मिळवण्यापेक्षा समाजाचे वैचारिक प्रबोधन करणे आणि नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे अधिक आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. एम. एन. रॉय यांनी मांडलेल्या बावीस मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे विकसित झालेल्या नवमानवतावादी विचारात स्वातंत्र्य, बुद्धिवाद आणि मानवी नैतिकता यांना सर्वोच्च स्थान देण्यात आले. लोकशाही केवळ निवडणुकांवर टिकत नाही; ती नागरिकांच्या स्वातंत्र्यप्रिय वृत्ती आणि विवेकशीलतेवर उभी राहते, ही भूमिका शास्त्रीजींनी मांडली. भूतकाळाचा आदर राखावा, पण भविष्य घडविताना त्याचे अंधानुकरण करू नये; असा त्यांचा आग्रह होता.