तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
धर्म म्हणजे काही अपरिवर्तनीय नियमांचा संच नव्हे, तर समाजाला नैतिक दिशा देणारी आणि काळानुसार विकसित होत राहणारी जीवनव्यवस्था होय
शास्त्रीजींच्या कार्यकाळात त्यांचे आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यातील स्नेहबंध विशेष महत्त्वाचे ठरले. समान ध्येय, विचारांची जवळीक आणि परस्पर आदर यांवर त्यांचे हे नाते आधारलेले होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत दोघांनीही आपापल्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली. यशवंतरावांनी आपल्या राजकीय जीवनात वेळोवेळी शास्त्रीजींचा सल्ला घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासासाठी आवश्यक असलेल्या नियोजनाची जबाबदारीही त्यांनी शास्त्रीजींवर सोपवली. या परस्पर विश्वासातून निर्माण झालेल्या नात्याचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासालाही मोठा उपयोग झाला.
त्यांच्या मैत्रीची पाळेमुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय चळवळीत रुजली होती. यशवंतराव चव्हाण यांनी शास्त्रीजींनी पहिल्यांदा पाहिले, तो प्रसंग ते आयुष्यभर विसरले नाहीत. १९३० मध्ये महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीने संपूर्ण देश पेटून उठला होता. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे कृष्णेच्या घाटावर स्वातंत्र्यसैनिकांची विराट सभा भरली होती. त्या प्रचंड जनसमुदायासमोर वाईच्या प्राज्ञपाठशाळेतून आलेला एक तरुण शास्त्री काँग्रेसचा आणि असहकाराचा संदेश अत्यंत ओजस्वी शब्दांत मांडत होता. यशवंतराव तेव्हा शाळेत शिकत होते. शाळा बुडवून ते या भाषणाला उपस्थित होते.
त्या दिवसाची आठवण सांगताना यशवंतरावांनी लिहिले आहे,
"उघड्या अंगावर बंगाली पद्धतीने घेतलेली शाल, चेहऱ्यावर प्रखर पांडित्याचे आणि देशप्रेमाचे तेज, अशी तर्कतीर्थांची मूर्ती आजही माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे."
त्या सभेत शास्त्रीजींनी केलेले एक विधान विशेष गाजले. त्याचा तरुण यशवंतरावांच्या मनावर खोल ठसा उमटला. भाषणात शास्त्रीजी म्हणाले होते,
"मी माझ्या गुरूच्या पायाशी बसून सर्व शास्त्रांत पारंगत झालो आहे. आता मला या शास्त्रांचे रूपांतर शस्त्रात करायचे आहे. ही महान शास्त्रे जर आज देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शस्त्रे बनली नाहीत, तर हिंदुस्थान कायमचा गुलाम राहील!"
ज्ञानाचा उपयोग केवळ पांडित्य मिरवण्यासाठी नव्हे, तर राष्ट्रमुक्तीसाठी व्हावा, हा संदेश त्या एका वाक्यातून त्यांनी दिला. त्यांनी उच्चारलेले ते शब्द श्रोत्यांच्या मनात विजेसारखे कोसळले. यशवंतरावही त्यातले एक होते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला दिशा देणाऱ्या या नेत्याच्या मनात शास्त्रीजींविषयी निर्माण झालेला आदर आणि आत्मीयता याच दिवसापासून दृढ झाली. भारताच्या पारतंत्र्याची आणि बौद्धिक गुलामगिरीची इतकी मार्मिक कारणमीमांसा यशवंतरावांनी यापूर्वी कधीही ऐकली नव्हती. त्या भेटीतून सुरू झालेला परिचय पुढे राजकीय सहकार्यामध्ये आणि अखेर आयुष्यभर टिकलेल्या मैत्रीत रूपांतरित झाला.
स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मुंबई प्रांताच्या विधानसभेसाठी कऱ्हाड मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने ही निर्णायक निवडणूक होती. स्थानिक पातळीवर त्यांच्याविरुद्ध प्रबळ आव्हान उभे होते.
या निर्णायक वेळी शास्त्रीजी आपल्या मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी कऱ्हाड आणि सातारा परिसरात यशवंतरावांच्या प्रचारासाठी दौरे केले. शास्त्रीजींची अभ्यासपूर्ण आणि ओघवती भाषणे ऐकण्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने लोक जमत असत.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी कऱ्हाड येथे त्यांची भव्य सभा झाली. रात्री सुमारे अकरा वाजता भाषण संपले. त्यानंतर शास्त्रीजींचा मुक्काम त्यांचे स्नेही पांडुअण्णा शिराळकर यांच्या घरी होता. त्या रात्री यशवंतरावही तेथे आले. दिवसभराच्या धावपळीने दोघेही थकले होते; पण डोळ्यांत झोप नव्हती. निवडणुकीचे संभाव्य निकाल, देशाच्या राजकारणाची पुढील दिशा आणि भविष्यातील आव्हाने यांवर चर्चा करत त्यांनी जवळजवळ संपूर्ण रात्र जागून काढली.
निकाल जाहीर झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण अवघ्या ५२ मतांच्या फरकाने विजयी झाले. हा विजय किती निसटता होता, याची जाणीव सर्वांनाच झाली. शास्त्रीजींनी केलेला व्यापक प्रचार आणि मतदारांशी साधलेला थेट संवाद या विजयात महत्त्वाचा ठरला, याची जाणीव यशवंतराव स्वतःही व्यक्त करत असत. अवघ्या ५२ मतांनी मिळालेला हा विजय त्यांच्या पुढील राजकीय प्रवासासाठी महत्त्वाचा ठरला.
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाण नव्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र प्रशासकीयदृष्ट्या सक्षम राज्य व्हावे ही तर त्यांची इच्छा होतीच. परंतु त्याचबरोबर शिक्षण, उद्योग, शेती, साहित्य आणि संस्कृती यातही महाराष्ट्र हे एक प्रगत राज्य म्हणून गणले जावे अशी त्यांची इच्छा होती. या व्यापक ध्येयाला वैचारिक अधिष्ठान देण्यासाठी त्यांनी शास्त्रीजींशी सल्लामसलत सुरू केली.
शास्त्रीजींनी यशवंतरावांना एम. एन. रॉय यांच्या नवमानवतावादी विचारांची ओळख करून दिली. रॉय यांनी मांडलेल्या बावीस वैचारिक आणि लोकशाही तत्त्वांचा यशवंतरावांनी सखोल अभ्यास केला. या विचारांच्या आधारे यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ह. रा. महाजनी आणि प्रा. गोवर्धन पारीख या विद्वानांनी आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाची वैचारिक चौकट घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीला बळ देण्यासाठी यशवंतरावांनी १९६० मध्ये ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ स्थापन केले. या मंडळाच्या पहिल्या अध्यक्षपदी त्यांनी शास्त्रीजींची नियुक्ती केली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शास्त्रीजींनी या पदावरून केले. पुढे मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मराठी विश्वकोश’ निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्रारंभ झाला. या महान कार्याची धुरा शास्त्रीजींनी आयुष्यभर समर्थपणे सांभाळली.
१९६२ मध्ये चीनने भारतावर अचानक आक्रमण केले. या युद्धातील पराभवामुळे देशभर निराशा आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिल्यानंतर देशासमोर सक्षम नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला. अशा कठीण प्रसंगी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला बोलावून देशाचे संरक्षणमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली.
नेहरूंचा दूरध्वनी आल्यानंतर यशवंतराव चव्हाण द्विधा मनःस्थितीत पडले. महाराष्ट्राच्या उभारणीची अनेक महत्त्वाची कामे नुकतीच सुरू झाली होती. अशा वेळी राज्य सोडून दिल्लीला जाण्याचा निर्णय त्यांना सहजासहजी घेता येत नव्हता. त्यांनी नेहरूंना नम्रपणे सांगितले,
"पंडितजी, मला विचार करण्यासाठी थोडी सवड हवी आहे."
त्यावर नेहरूंनी विचारले,
"तुम्ही याबाबत कोणाचा सल्ला घेणार आहात?"
यशवंतराव हसत म्हणाले,
"माझ्या पत्नीचा, वेणुताईंचा."
वेणुताईंशी चर्चा झाल्यानंतर यशवंतरावांनी मुंबईहून थेट वाईला शास्त्रीजींना दूरध्वनी केला आणि तातडीने भेटण्याची विनंती केली. मित्राचे निमंत्रण मिळताच शास्त्रीजी दुसऱ्याच दिवशी सकाळी मुंबईला पोहोचले. शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये बराच वेळ गंभीर चर्चा झाली. यशवंतरावांच्या मनातील द्विधा अवस्था शास्त्रीजींनी ओळखली आणि अत्यंत थोडक्यात, पण दूरदृष्टी दाखवणारा सल्ला दिला.
"यशवंतराव, केंद्रात जाण्याची आणि देशाचे रक्षण करण्याची ही संधी मुळीच सोडू नका. राष्ट्र सुरक्षित राहिले, तरच महाराष्ट्रही सुरक्षित राहील. राष्ट्र संकटात असताना केवळ राज्याचा विचार करणे आपल्या नेतृत्वाला शोभणार नाही."
शास्त्रीजींच्या या स्पष्ट आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या सल्ल्याने यशवंतरावांच्या मनातील संभ्रम दूर झाला. त्यांनी संरक्षणमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पुढे हा निर्णय त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आणि देशाच्या संरक्षणव्यवस्थेलाही नवी दिशा देणारा ठरला.
१९६० आणि ७० च्या दशकात भारतीय राजकारणावर इंदिरा गांधींचा प्रभाव वाढत गेला. यशवंतराव चव्हाण केंद्रात संरक्षण, गृह, अर्थ आणि परराष्ट्र अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून कार्यरत होते. मात्र, बदलती राजकीय समीकरणे आणि इंदिरा गांधींची कार्यपद्धती यांमुळे त्यांना अनेकदा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले.
वाई येथे राहूनही शास्त्रीजी दिल्लीतील राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असत. यशवंतरावांच्या अनेक निर्णयांचे ते कौतुक करत; परंतु जेव्हा त्यांना मित्राची भूमिका आवश्यकतेपेक्षा अधिक मवाळ वाटे, तेव्हा ते तेवढ्याच स्पष्टपणे नाराजीही व्यक्त करत. विशेषतः आणीबाणीच्या काळात आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना यशवंतरावांनी अधिक ठाम भूमिका घ्यायला हवी होती, असे शास्त्रीजींचे मत होते.
ते आपल्या निकटवर्तीयांशी बोलताना म्हणत,
"आमचे मित्र यशवंतराव अत्यंत सुसंस्कृत आणि मृदू स्वभावाचे आहेत. पण विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत केवळ सुसंस्कृतपणा पुरेसा नसतो. सत्ताधाऱ्यांवर आवश्यक दबाव निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षनेता प्रसंगी सडेतोड आणि आक्रमकही असला पाहिजे."
असे असले तरी या मतभेदांमुळे त्यांच्या मैत्रीत कधीच दुरावा आला नाही. यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाविषयीचा शास्त्रीजींचा आदर आणि शास्त्रीजींच्या प्रामाणिकपणाविषयीचा यशवंतरावांचा विश्वास अखेरपर्यंत तसाच अबाधित राहिला.
जेव्हा यशवंतराव चव्हाण काही काळ मुख्य काँग्रेस प्रवाहापासून दूर गेले, तेव्हा शास्त्रीजी मनोमन अस्वस्थ झाले. आपल्या मित्राची राजकीय कोंडी त्यांना पाहवत नव्हती. यशवंतरावांनी पुन्हा आपल्या मूळ राजकीय प्रवाहात परतावे, असे त्यांना मनापासून वाटत होते. शास्त्रीजींनी तसा सल्ला यशवंतरावांना दिला देखील. त्यानंतर यशवंतराव स्वगृही परतले हे सर्वज्ञात आहे. मित्राच्या राजकीय आयुष्यातील निर्णायक क्षणीही शास्त्रीजींचे वैचारिक मार्गदर्शन त्यांच्या पाठीशी उभे होते.
दोघांचे नाते केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. ते एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते होते. यशवंतरावांच्या आयुष्यात जेव्हा वैयक्तिक दुःखाचे प्रसंग आले, तेव्हा त्यांना धीर देण्यासाठी शास्त्रीजी नेहमीच उभे राहिले.
एकदा यशवंतरावांच्या अत्यंत लाडक्या पुतण्याचा भीषण मोटार अपघातात मृत्यू झाला. या अनपेक्षित आघाताने ते पूर्णपणे हादरून गेले. त्यांनी वाईला दूरध्वनी करून शास्त्रीजींशी संवाद साधला. अत्यंत व्यथित स्वरात ते म्हणाले,
"शास्त्रीजी, माझ्या आयुष्यातला सर्व आनंद आता कायमचा निघून गेला आहे..."
त्या दुःखाच्या क्षणी शास्त्रीजींनी मित्राचे सांत्वन केले. त्यांना मानसिक बळ मिळावे यासाठी धीराचे, समजुतीचे शब्द सांगितले. अशा प्रसंगांतून त्यांच्या मैत्रीचा पाया राजकारणापलीकडचा होता, हे अधिक स्पष्टपणे दिसून येते.
यानंतर काहीच दिवसांत यशवंतरावांच्या जीवनावर आणखी एक मोठा आघात झाला. त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी असलेल्या सौ. वेणुताई चव्हाण यांचे निधन झाले. या दुःखाने यशवंतराव पूर्णपणे खचून गेले. शास्त्रीजींनी त्यांना तातडीने सांत्वनपर पत्र पाठवले; परंतु नुसते पत्र पाठवून समाधान होण्यासारखी ही वेळ नव्हती. दोघांनाही प्रत्यक्ष भेटीची गरज वाटत होती.
अखेर पुण्यात दोघांची भेट झाली. वेणुताईंच्या आठवणींनी व्याकूळ झालेले यशवंतराव शास्त्रीजींना पाहताच लहान मुलासारखे ओक्साबोक्शी रडू लागले. मित्राची ती अवस्था पाहून प्रखर बुद्धिमत्तेचे धनी असलेले शास्त्रीजीही निःशब्द झाले. त्या क्षणी सांत्वनाचे शब्दही अपुरे वाटत होते.
शास्त्रीजींनी काहीही न बोलता शांतपणे यशवंतरावांच्या पाठीवर मायेचा हात ठेवला. काही मिनिटे तो मूक स्पर्शच दोघांमधील संवाद ठरला. त्या स्पर्शाने यशवंतरावांच्या मनाला मोठा आधार मिळाला. नंतर त्यांनी आपल्या डायरीत लिहिले,
"वेणुताईंच्या निधनानंतर शास्त्रीजींनी माझ्या पाठीवर ठेवलेला तो मायेचा हात मला जीवनात पुन्हा उभे राहण्याची ताकद देऊन गेला."
२५ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्ली येथे यशवंतराव चव्हाण यांचे आकस्मिक निधन झाले. ही बातमी वाईला पोहोचताच शास्त्रीजींना मोठा धक्का बसला. कऱ्हाडच्या कृष्णाघाटावर पन्नास वर्षांपूर्वी प्रथम भेटलेला तो तरुण नेता कायमचा निघून गेला होता.
त्या रात्री त्र्याऐंशी वर्षांच्या शास्त्रीजींचा डोळ्याला डोळा लागला नाही. ते रात्रभर अस्वस्थपणे घरात येरझाऱ्या घालत राहिले. सकाळ होताच त्यांनी कऱ्हाडचा मार्ग धरला.
कऱ्हाड येथे यशवंतरावांचे पार्थिव घेऊन हेलिकॉप्टर उतरले, तेव्हा परिसरातील शेकडो गावांमधून आलेल्या जनसमुदायाने अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. त्या गर्दीत आपल्या मित्राच्या पार्थिवापाशी सर्वप्रथम पोहोचणाऱ्यांमध्ये शास्त्रीजी होते. जड अंतःकरणाने त्यांनी आपल्या जिवलग मित्राचे अखेरचे दर्शन घेतले.
त्यानंतर ते यशवंतराव मोहिते यांच्या शेजारी शांतपणे बसून राहिले. सभेत श्रद्धांजली वाहण्याची विनंती झाल्यावर ते उभे राहिले. डोळ्यांत अश्रू होते, पण आवाज नेहमीप्रमाणे स्थिर आणि गंभीर होता. त्यांनी यशवंतरावांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या सुसंस्कृत स्वभावाचा आणि महाराष्ट्राच्या घडणीत त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
यशवंतरावांच्या निधनाने तर्कतीर्थांच्या आयुष्यातील एक जिव्हाळ्याचा आणि वैचारिक सहप्रवासी संपला. मात्र आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत या दोन मित्रांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या मैत्रीचा आदर्श इतिहासात स्मरणात राहील.