तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
धर्म म्हणजे काही अपरिवर्तनीय नियमांचा संच नव्हे, तर समाजाला नैतिक दिशा देणारी आणि काळानुसार विकसित होत राहणारी जीवनव्यवस्था होय
इ. स. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर राज्याच्या सांस्कृतिक विकासाला चालना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून ‘साहित्य आणि संस्कृती मंडळा’ची स्थापना झाली, हे आपण पाहिलेच आहे. मराठी भाषेच्या आणि संस्कृतीच्या व्यापक विकासाचा विचार करताना मंडळाने एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ती म्हणजे ‘मराठी विश्वकोशा’ची निर्मिती. या प्रकल्पाचा आवाका आणि स्वरूप जसजसे स्पष्ट होत गेले, तसतसा त्याचा विस्तारही मोठा होत गेला. त्यामुळे पुढे ‘मराठी ज्ञानकोशा’चा प्रकल्प ‘साहित्य आणि संस्कृती मंडळा’पासून स्वतंत्र करण्यात आला. ‘साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या कार्याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे, तर ‘मराठी ज्ञानकोशा’च्या निर्मितीचा आणि विकासाचा सविस्तर आढावा स्वतंत्र प्रकरणात घेतला आहे.
कोणत्याही भाषेचे सामर्थ्य केवळ तिच्या ललित साहित्यावर ठरत नाही. त्या भाषेत भौतिक, सामाजिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञान किती व्यापकपणे उपलब्ध आहे, यावरही तिची खरी क्षमता अवलंबून असते. इंग्रजी भाषेत ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’प्रमाणे सर्वसमावेशक आणि विश्वसनीय ज्ञानकोश उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर मराठी भाषेतही जागतिक दर्जाचा आणि सर्व ज्ञानशाखांचा परिचय करून देणारा विश्वकोश असावा, असे शास्त्रीजींना वाटत होते. त्यांच्या या कल्पनेला महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आणि अशा प्रकारे मराठी विश्वकोशाच्या महत्त्वाकांक्षी कार्याला प्रारंभ झाला.
शास्त्रीजींच्या मते विज्ञान, तंत्रज्ञान, कला, इतिहास, राजकारण आणि तत्त्वज्ञान यांसारख्या आधुनिक शाखांचे प्रतिबिंब सर्वसामान्य मराठी माणसाच्या दैनंदिन जीवनात उमटले पाहिजे. मानवी जीवन अधिक सुकर, सुसंस्कृत आणि वैज्ञानिक बनविणे हेच खऱ्या अर्थाने साहित्याचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. म्हणूनच विश्वकोश हा सामान्य माणसाच्या हातातील ज्ञानाचे साधन व्हावे अशी तर्कतीर्थांची भूमिका होती. अशा व्यापक विचारातून उभा राहिलेला मराठी विश्वकोश हा आधुनिक महाराष्ट्राच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज झाला.
विश्वकोशाच्या रचनेला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे मुख्य संपादकीय कार्यालय कुठे असावे, यावर मोठी चर्चा सुरू झाली. मुंबई आणि पुण्यातील अनेक विद्वानांचे मत होते की, विश्वकोशासारखा मोठा प्रकल्प केवळ मुंबई-पुण्यासारख्या शहरातच यशस्वीपणे राबविता येईल. वाईसारख्या छोट्या आणि तुलनेने आडवळणाच्या गावात विश्वकोशाचे कार्यालय स्थापन केल्यास विद्वानांना लागणारे संदर्भग्रंथ, त्यांच्या निवासाची व्यवस्था आणि मुद्रणासारख्या महत्त्वाच्या कामांची सोय कशी केली जाईल, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतु शास्त्रीजींनी विश्वकोशाचे मुख्य कार्यालय वाई येथेच सुरू करण्याचा व्यावहारिक निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वाईवरील प्रेमातून किंवा भावनिक कारणांमुळे घेतलेला नव्हता. त्यामागे अत्यंत विचारपूर्वक आखलेली आर्थिक आणि व्यवस्थापकीय भूमिका होती.
त्या काळी महाराष्ट्र शासनाने विश्वकोशाच्या कामासाठी वाईमध्ये येऊन राहणाऱ्या विद्वान आणि लेखकांसाठी प्रत्येकी केवळ ३५ रुपयांची आर्थिक तरतूद केली होती. मुंबई किंवा पुण्यासारख्या महागड्या शहरात या रकमेत एखाद्या व्यक्तीचा राहण्याचा आणि भोजनाचा खर्च पुरेसा नव्हता. वाईमध्ये मात्र या ३५ रुपयांत लेखकांच्या राहण्या-खाण्याची समाधानकारक व्यवस्था करणे शक्य होते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे वाईतील प्राज्ञपाठशाळा मंडळाचा अफाट ग्रंथसंग्रह. या ग्रंथालयात आधीपासूनच सुमारे ३० हजार प्राचीन व आधुनिक संदर्भग्रंथ, तसेच १० हजारांहून अधिक मौल्यवान हस्तलिखित पोथ्या उपलब्ध होत्या. विश्वकोशाच्या अभ्यासपूर्ण लेखनासाठी हा ज्ञानसाठा अत्यंत उपयुक्त ठरणार होता. नव्याने स्वतंत्र ग्रंथालय उभारून हजारो संदर्भग्रंथांची खरेदी करण्यासाठी लागणारा प्रचंड खर्च त्यामुळे वाचणार होता. तिसरी महत्त्वाची सोय म्हणजे वाईतील प्राज्ञपाठशाळेचा स्वतःचा ‘प्राज्ञ प्रेस’. विश्वकोशाच्या लेखनानंतर छपाईची प्रक्रिया ही अत्यंत वेळखाऊ असते. प्राज्ञ प्रेस उपलब्ध असल्यामुळे यामध्ये सुसूत्रता राखणे शक्य झाले.
याशिवाय वाईचे शांत, निसर्गरम्य आणि निवांत वातावरणही शास्त्रीजींच्या निर्णयामागील एक महत्त्वाचा घटक होता. विश्वकोशाचे काम हे केवळ माहिती गोळा करण्याचे नव्हते. त्यासाठी सातत्यपूर्ण वाचन, संशोधन, चिंतन, चर्चा आणि एकाग्र लेखन आवश्यक होते. महानगरातील धावपळ आणि गोंगाट यांपासून दूर असलेले वाईचे वातावरण अशा बौद्धिक कार्यासाठी अधिक अनुकूल होते. अशा प्रकारे आर्थिक काटकसर, समृद्ध ग्रंथसंपदा, उपलब्ध मुद्रणव्यवस्था आणि अभ्यासाला पोषक वातावरण या सर्व बाबींचा विचार करून तर्कतीर्थांनी विश्वकोशाचे मुख्यालय वाई येथे स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
विश्वकोशाच्या कामानिमित्त देशभरातून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक नामवंत पंडित, लेखक, संशोधक आणि समीक्षक वाई येथे येत असत. या विद्वानांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करणे ही एक मोठी जबाबदारी होती. ही जबाबदारी शास्त्रीजींच्या सहधर्मचारिणी सत्यवतीबाई यांनी आपल्या खांद्यावर घेतली.
प्राज्ञपाठशाळेत येणाऱ्या अभ्यागतांसाठी सत्यवतीबाईंनी एक प्रकारची घरगुती भोजनशाळाच सुरू केली होती. त्या पहाटे उठून विद्वानांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची तयारी करत असत. प्रत्येक पाहुण्याच्या आवडीनिवडी त्यांना माहित असत. आवश्यक तेथे सर्व व्यवस्था वेळेवर पोहोचत आहे की नाही, याचीही त्या काळजी घेत. त्यांच्या या आपुलकीने वाईत येणाऱ्या विद्वानाला परक्या ठिकाणी असल्याची जाणीव होत नसे. घरापासून दूर असूनही त्याला आपुलकीचे वातावरण लाभे.
विश्वकोशासारख्या व्यापक ज्ञानप्रकल्पाची उभारणी केवळ एका व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर किंवा प्रयत्नांवर शक्य नव्हती, याची तर्कतीर्थांना पूर्ण जाणीव होती. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील विविध ज्ञानशाखांतील नामवंत विचारवंत आणि विद्वानांची एक सल्लागार समिती उभी केली. या समितीत एम. एन. रॉय यांचे सहकारी आणि अर्थतज्ज्ञ प्रा. गोवर्धन पारीख, सुप्रसिद्ध विचारवंत व समीक्षक प्रा. गं. बा. सरदार, मार्क्सवादी विचारवंत व लेखक दि. के. बेडेकर, भाषातज्ज्ञ डॉ. मा. गो. काळेलकर, कवी आ. रा. देशपांडे ऊर्फ ‘अनिल’, तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्रा. मे. पु. रेगे आणि मुद्रणशास्त्राचे तज्ज्ञ बापूराव नाईक यांसारख्या मान्यवरांचा समावेश होता.
या विद्वानांच्या बैठका वाई येथील विश्वकोश कार्यालयात नियमितपणे होत असत. विविध ज्ञानशाखांतील त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा उपयोग करून विश्वकोशाच्या प्रत्येक भागाची रचना, विषयांची निवड, लेखनाची दिशा आणि संपादकीय आराखडा अत्यंत काटेकोरपणे निश्चित केला जाई. या सामूहिक प्रयत्नांमुळे मराठी विश्वकोशाची उभारणी महाराष्ट्रातील विविध वैचारिक परंपरांना एकत्र आणणारी एक अभूतपूर्व चळवळ बनली.
विश्वकोशाचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर शास्त्रीजींच्या समोर एक मोठा प्रश्न उभा ठाकला. पाश्चात्त्य देशांमध्ये शेकडो वर्षांपासून विज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा वेगाने विकास झाला होता. त्या विकासाबरोबरच त्या त्या ज्ञानशाखांतील असंख्य संकल्पना आणि त्यांची परिभाषा पाश्चात्त्य भाषांमध्ये रूढ झाली होती. मराठीसमोर मात्र वेगळीच अडचण होती. आधुनिक विज्ञान आणि ज्ञानशाखांतील अनेक संकल्पनांसाठी मराठीत नेमके आणि सर्वमान्य प्रतिशब्द उपलब्ध नव्हते. थेट इंग्रजी शब्दांचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला, तर मराठीचे स्वाभाविक स्वरूप बिघडेल, अशी भीती होती; तर दुसरीकडे प्रत्येक इंग्रजी शब्दासाठी अत्यंत संस्कृतप्रचुर आणि क्लिष्ट प्रतिशब्द तयार केले, तर ते सामान्य वाचकांच्या आकलनाबाहेर जातील. त्यामुळे भाषेची शुद्धता आणि भाषेची सुलभता यांचा समतोल साधणे, हे शास्त्रीजींसमोरील मोठे आव्हान होते.
या समस्येवर मात करण्यासाठी तर्कतीर्थांनी अत्यंत दूरदर्शी निर्णय घेतला. विश्वकोशाचे मूळ खंड तयार करण्यापूर्वीच आधुनिक ज्ञानशाखांसाठी आवश्यक असलेल्या संज्ञा आणि प्रतिशब्द निश्चित करणारा स्वतंत्र ‘परिभाषा कोश’ तयार करावा, असे त्यांनी ठरविले. पुढे हा परिभाषा कोश विश्वकोशाचा अठरावा खंड म्हणून ओळखला गेला. प्रत्यक्ष विश्वकोशाच्या निर्मितीपूर्वी परिभाषेचा पाया भक्कम करण्याचा हा निर्णय मराठी ज्ञानभाषेच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला.
शास्त्रीजींचे भाषिक धोरण त्या काळातील स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा डॉ. रघुवीर यांच्या भाषाशुद्धीच्या भूमिकेपेक्षा वेगळे आणि अधिक व्यवहारी होते. भाषेतील परकीय शब्दांचे पूर्ण उच्चाटन करून त्यांच्या जागी संस्कृतप्रचुर प्रतिशब्द रूढ करण्याचा अतिरेक त्यांनी टाळला. त्यांच्या मते, मराठी भाषेत एखादा देशी किंवा परकीय शब्द आधीपासून रूढ झाला असेल आणि तो सर्वसामान्यांच्या सहज आकलनात येत असेल, तर तो केवळ परकीय आहे म्हणून टाळण्याचे कारण नाही. इंग्रजी, फारसी किंवा अन्य भाषांमधून मराठीत रूढ झालेले शब्द आवश्यक तेथे तसेच वापरावेत, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती.
विश्वकोशाच्या कामाची गती, शिस्त आणि नियोजन यांनाही तर्कतीर्थांनी तितकेच महत्त्व दिले. मुद्रणाच्या कामाची जबाबदारी त्यांनी बापूराव नाईक यांच्या साहाय्याने वाईतील मुद्रणव्यवस्थेकडे सोपवली. १९६५ मध्ये विश्वकोशाचा पहिला ‘परिचय खंड’ प्रसिद्ध झाला. यानंतर प्रत्यक्ष विश्वकोशाच्या मुख्य खंडांची निर्मिती वेगाने सुरू झाली. १९७६ मध्ये विश्वकोशाचा पहिला खंड पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या भव्य सभागृहात प्रकाशित करण्यात आला. हा सोहळा विश्वकोशाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते या खंडाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचीही या प्रसंगी उपस्थिती होती. त्यानंतर परिचय खंडासह विश्वकोशाचे पहिले पाच खंड यशस्वीरीत्या प्रकाशित झाले. तर्कतीर्थांच्या नियोजनामुळे आणि विविध क्षेत्रांतील विद्वानांच्या शिस्तबद्ध सहकार्यामुळे या प्रकल्पाने कामाच्या वेगाचा आणि गुणवत्तेचा एक नवा आदर्श निर्माण केला.
शास्त्रीजी हे केवळ विश्वकोशाचे प्रशासकीय प्रमुख किंवा मार्गदर्शक नव्हते. या ज्ञानयज्ञात त्यांचे स्वतःचे बौद्धिक योगदानही अत्यंत महत्त्वपूर्ण होते. त्यांनी विश्वकोशासाठी शेकडो मोलाच्या आणि सखोल वैचारिक नोंदी लिहिल्या. प्राचीन भारतीय दर्शने, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र आणि समाजशास्त्र या त्यांच्या विशेष अभ्यासाच्या विषयांवर त्यांनी लेखन केले. शास्त्रीजींच्या नोंदींमध्ये त्यांच्या विवेकवादी चिंतनाची प्रचीती येते. ‘महाभारत’ आणि ‘रामायण’ या प्राचीन महाकाव्यांवरील त्यांच्या प्रदीर्घ नोंदींमध्ये त्यांनी केवळ पारंपरिक धार्मिक दृष्टिकोन स्वीकारला नाही, तर त्यांचे विश्लेषण केले. भारतीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. चार्वाकाचा जडवाद, जडवाद आणि अनीश्वरवाद, जैन धर्म, बौद्ध धर्म, वेदान्त आणि न्यायशास्त्र यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या विषयांवर त्यांनी सुबोध, तर्कशुद्ध आणि अभ्यासपूर्ण नोंदी लिहिल्या. ‘जातिसंस्था’ ही तर्कतीर्थांनी लिहिलेली विश्वकोशातील सर्वांत दीर्घ आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण नोंदींपैकी एक मानली जाते. या विस्तृत लेखात त्यांनी जातिसंस्थेच्या सुमारे तीन हजार वर्षांच्या इतिहासाचा वेध घेतला. तिची उत्पत्ती, कालानुरूप झालेला विकास, सामाजिक जीवनावर झालेले तिचे परिणाम आणि जातिव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या शोषणकारी संरचनांचे त्यांनी अत्यंत निर्भीडपणे विश्लेषण केले. जातिसंस्था ही मानवनिर्मित सामाजिक रचना असून ती हिंदू धर्माची मूलभूत आणि अपरिवर्तनीय संकल्पना नाही, हे त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून स्पष्ट केले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या आयुष्यातील तीसहून अधिक वर्षे ‘मराठी विश्वकोश’ या ज्ञानप्रकल्पासाठी समर्पित केली. संगणकीय युगाच्या कितीतरी आधी, इंटरनेट किंवा डिजिटल साधनांची कोणतीही उपलब्धता नसताना, वाईसारख्या छोट्या गावातून जगातील विविध ज्ञानशाखांतील माहिती संकलित करून ती मराठी भाषेत सुसंगत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने उपलब्ध करून देणे, हे अभूतपूर्व कार्य होते.
वीस खंडांची मूळ आखणी असलेला, अंतिमतः पंचवीस खंडांमध्ये आकाराला आलेला हा विशाल ज्ञानसंचय तर्कतीर्थांच्या दूरदृष्टीचा आणि संघटनकौशल्याचा आविष्कार होता.