तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
धर्म म्हणजे काही अपरिवर्तनीय नियमांचा संच नव्हे, तर समाजाला नैतिक दिशा देणारी आणि काळानुसार विकसित होत राहणारी जीवनव्यवस्था होय
शास्त्रीजींच्या वैचारिक जडणघडणीत महात्मा गांधींचे स्थान महत्त्वाचे होते. शास्त्रीजींनी वेद आणि उपनिषदे यांचा सखोल अभ्यास करून पारंपरिक भारतीय तत्त्वज्ञानात प्रावीण्य मिळवले होते. तर दुसऱ्या बाजूला महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रभावी राजकीय नेतृत्व दिले होते. या दोघांमधला संबंध केवळ नेत्याचा आणि अनुयायाचा नव्हता. तर ती एका विद्वानाची आणि सत्याच्या शोधात असलेल्या नेत्याची वैचारिक देवाणघेवाण होती. गांधीजींच्या प्रभावामुळे शास्त्रीजींनी स्वतःला देशकार्याशी जोडून घेतले, तर अस्पृश्यता निवारण आणि धर्मसुधारणेच्या गांधीजींच्या प्रयत्नांना शास्त्रीजींनी शास्त्राधार दिला. मात्र काही तात्त्विक प्रश्नांवर दोघांमध्ये मतभेदही झाले. परंतु त्यामुळेच त्यांचे नाते अधिक अर्थपूर्ण बनले.
लक्ष्मणशास्त्रींच्या आयुष्याला खरी राष्ट्रीय आणि राजकीय दिशा १९२१ साली मिळाली. ते एका ग्रंथालयातील हस्तलिखितांचा अभ्यास करण्यासाठी बडोद्याला गेले होते. तेथील काम पूर्ण करून कलकत्त्याला परत जात असताना वाटेत त्यांची गाडी बार्डोली येथे थांबली. त्या काळात बार्डोली परिसरात वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा साराबंदी सत्याग्रह सुरू होता. रेल्वे स्थानकावर जमलेली देशभक्तांची गर्दी आणि राष्ट्रप्रेमाने भारलेले वातावरण पाहून शास्त्रीजींच्या मनात देशसेवेची प्रेरणा जागी झाली. त्यांनी कलकत्त्याचा पुढील प्रवास रद्द केला आणि थेट साबरमती आश्रमाची वाट धरली. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
साबरमती आश्रमात पोहोचल्यानंतर शास्त्रीजींनी गांधीजींचे निकटचे सहकारी मगनलाल गांधी यांची भेट घेऊन आश्रमात राहण्याची परवानगी मागितली. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या प्रार्थनासभेत त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात कठोपनिषदातील निवडक मंत्रांचे संस्कृतमध्ये वेदपठण केले. ते ऐकून महात्मा गांधी अतिशय प्रभावित झाले. त्यांनी शास्त्रीजींची आस्थेने चौकशी केली आणि कौतुकाने विचारले,
“शास्त्रीजी, तुम्ही एवढे मोठे विद्वान आहात. आता पुढे आणखी काय शिकणार आहात? इथेच राहा आणि स्वतःला देशकार्याला वाहून घ्या.”
गांधीजींच्या या शब्दांचा अवघ्या एकवीस वर्षांच्या तरुण शास्त्रीजींच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी गांधीजींचा सल्ला शिरसावंद्य मानला आणि पुढील दोन महिने साबरमती आश्रमातच वास्तव्यास राहिले. या काळात त्यांना विठ्ठलभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू, अंबालाल साराभाई आणि अनुसूयाबेन यांसारख्या अनेक राष्ट्रीय नेत्यांना जवळून पाहण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. गांधीजींची सत्य आणि अहिंसेवर आधारलेली संघर्षपद्धती त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. या वास्तव्यातून शास्त्रीजींच्या विचारांना नवी दिशा मिळाली. त्या वेळी साबरमती आश्रमात विनोबा भावे यांचेही वास्तव्य होते. शास्त्रीजींचा त्यांच्याशी पूर्वीच परिचय होता. मात्र, आश्रमातील या सहवासामुळे दोघांमधील स्नेहबंध अधिक दृढ झाला.
पुढे १९२९ मध्ये लोणावळ्याच्या कैवल्यधामात काही काळ अध्यापन केल्यानंतर शास्त्रीजी पुन्हा वाईला परतले आणि पूर्णवेळ स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. शंकरराव लेले, शंकरराव जोशी आणि मधुकर साठे यांसारख्या सहकाऱ्यांसह त्यांनी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांचे वक्तृत्व प्रभावी आणि प्रक्षोभक असे. त्यांचा पहिला प्रचारदौरा कऱ्हाड येथे झाला. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी शाळकरी यशवंतराव चव्हाण यांनी शाळा बुडवली होती.
१९३० मध्ये साताऱ्याचा दौरा आटोपून शास्त्रीजी नाशिक जिल्ह्यातील कळवण या तालुक्याच्या गावी सुरु असलेल्या जंगल सत्याग्रहात सामील झाले. कळवण येथे एका खाजगी जागेमध्ये रात्री दहाच्या सुमारास ते भाषण करत होते. तेथील स्थानिक पोलिसांना याचा सुगावा लागला. पोलिसांनी जागेवर छापा घालून शास्त्रीजींना अटक केली. प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपाखाली शास्त्रीजींना सहा महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना धुळ्याच्या तुरुंगात पाठवण्यात आले. हा त्यांच्या आयुष्यातील पहिला तुरुंगवास होता.
१९३२ मध्ये गांधीजींच्या दुसऱ्या आंदोलनात शास्त्रीजींना पुन्हा अटक होऊन त्यांची रवानगी धुळे कारागृहात करण्यात आली. तेथे ते मार्च ते नोव्हेंबर असे सलग नऊ महिने बंदीवान होते. हा कारावास शास्त्रीजींसाठी केवळ शिक्षेचा काळ नव्हता. कारावासात त्यांची अनेक नेत्यांशी भेट झाली आणि ज्ञानात भर पडली. विनोबा भावे, माधवजी शेठ, गुलझारीलाल नंदा, जमुनालाल बजाज आणि पुरुषोत्तमदास त्रिकम यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांचा सहवास शास्त्रीजींना मिळाला.
तुरुंगवासाच्या काळात शास्त्रीजींच्या वैचारिक प्रवासाला आणखी एक महत्त्वाचे वळण मिळाले. त्यांनी कार्ल मार्क्सचे ‘कॅपिटल’ आणि ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ तसेच एंगल्सच्या समाजवादी तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. सनातनी धर्मशास्त्राचा गाढा अभ्यासक असलेला हा तरुण पंडित आता मार्क्सवादी विचारांकडे आकर्षित होऊ लागला. याच काळात हिंदू धर्माच्या सामाजिक रचनेचा आणि त्यातील शोषणकारी प्रवृत्तींचा अभ्यास करण्याची कल्पना त्यांच्या मनात आकार घेत गेली. पुढे याच चिंतनातून १९४१ मध्ये ‘हिंदू धर्माची समीक्षा’ हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध झाला.
कारागृहात त्यांचा स्वतःचा अभ्यास सुरू असतानाच जमनालाल बजाज आणि माधवजी शेठ यांसारखे सहकारी त्यांच्याकडून उपनिषदांचे पाठ शिकू लागले. शास्त्रीजी उपनिषदांचा केवळ पारंपरिक अर्थ लावत नसत, तर त्यातील विचारांचा समाजोपयोगी आशयही उलगडून सांगत. त्यांच्या या नव्या आणि व्यापक दृष्टिकोनाने विनोबा भावेसुद्धा प्रभावित झाले. उपनिषदांचा असा अर्थ लावता येऊ शकतो, याचे त्यांनाही आश्चर्य वाटले. अशा प्रकारे कारागृहातील हा काळ शास्त्रीजींसाठी अध्ययन, चिंतन आणि वैचारिक संवादाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
१९३२ च्या अखेरीस अस्पृश्यता निर्मूलन आणि दलितांच्या हक्कांच्या प्रश्नासाठी महात्मा गांधींनी येरवडा कारागृहात उपोषण सुरू केले. गांधीजींच्या निमंत्रणावरून आणि जमनालाल बजाज यांच्या मध्यस्थीने स्वामी केवलानंद सरस्वती आणि शास्त्रीजी येरवडा कारागृहात गेले. तेथे गांधीजींच्या उपस्थितीत सनातनी पंडित अनंतकृष्ण शास्त्री आणि सुधारक विचारांचे प्रतिनिधित्व करणारे शास्त्रीजी यांच्यात अस्पृश्यतेच्या प्रश्नावर सलग अनेक दिवस चर्चा झाली. हा वाद धर्मशास्त्राच्या आधारे सामाजिक समतेचे समर्थन करता येऊ शकते का, या मूलभूत प्रश्नाभोवती केंद्रित होता.
यानंतर गांधीजींच्या सूचनेनुसार शास्त्रीजी आणि इतर सुधारणावादी पंडितांनी अस्पृश्यतेविरुद्ध एक जाहीरनामा तयार केला. हा जाहीरनामा ११ फेब्रुवारी १९३३ रोजी गांधीजींच्या ‘हरिजन’ साप्ताहिकाच्या पहिल्या अंकात अधिकृतरीत्या प्रसिद्ध झाला. त्यात स्पष्ट शब्दांत असे प्रतिपादन करण्यात आले होते :
“सर्व चारही वर्णांसाठी समान असणारे, मंदिर प्रवेश, शैक्षणिक संस्थांचा वापर, सार्वजनिक विहिरी, घाट, तलाव आणि नद्यांचा वापर हे सर्व अधिकार तथाकथित अस्पृश्यांनाही तितक्याच समानतेने मिळाले पाहिजेत. त्यांना या अधिकारांपासून वंचित ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे आपण मूळ धर्मशास्त्राच्या सिद्धांतांच्या आधारे सिद्ध करू शकतो.”
या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यास अनेक सनातनी पंडित धजावत नव्हते. मात्र शास्त्रीजींनी स्वाक्षरी करण्यात पुढाकार घेतला. या ऐतिहासिक जाहीरनाम्यावर पहिली स्वाक्षरी शास्त्रीजींचे परमपूज्य गुरु स्वामी केवलानंद सरस्वती यांची होती. त्यांच्या पाठोपाठ शास्त्रीजींनी आणि इतर पाच पंडितांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यांच्या या भूमिकेमुळे अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीला केवळ सामाजिकच नव्हे, तर धर्माचे अधिष्ठानही प्राप्त झाले. पारंपरिक धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनीच जेव्हा त्यातील मूलभूत तत्त्वांच्या आधारे सामाजिक समतेचा पुरस्कार केला, तेव्हा त्या सुधारणावादी भूमिकेला एक वेगळीच वैचारिक ताकद मिळाली. गांधीजींच्या चळवळीला शास्त्रीजींनी अशा प्रकारे शास्त्राच्या आधारावर वैचारिक बळ दिले.
अस्पृश्यता निवारणाची ही भूमिका शास्त्रीजींनी केवळ विचारांपुरती मर्यादित ठेवली नाही. प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांनी सामाजिक समतेचा आदर्श घालून दिला. १६ जून १९३३ रोजी पुण्यातील ‘पर्णकुटी’ येथे महात्मा गांधींचे सुपुत्र देवदास गांधी आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या लक्ष्मी यांचा आंतरजातीय विवाह आयोजित करण्यात आला होता. देवदास गांधी वैश्य वर्णातील होते, तर लक्ष्मी या तमिळ ब्राह्मण कुटुंबातील होत्या. त्या काळच्या कर्मठ सामाजिक वातावरणात या विवाहाला विशेष महत्त्व होते.
मात्र असा आंतरजातीय विवाह लावून देण्यास सनातनी पुरोहितांनी कडाडून विरोध केला आणि पौरोहित्य करण्यास नकार दिला. अशा वेळी महात्मा गांधींनी स्वतः तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना विवाहाचे पौरोहित्य करण्याची विनंती केली. शास्त्रीजींनी ती स्वीकारली आणि या विवाहाचे पौरोहित्य केले. त्या काळातील सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली, तर हे जातिभेदाविरुद्धच्या आपल्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे एक धाडसी पाऊल होते.
या प्रसंगाची देशभरातील वृत्तपत्रांनी मोठी दखल घेतली आणि त्यावर व्यापक चर्चा झाली. मात्र, या पुरोगामी भूमिकेची किंमत शास्त्रीजींना वैयक्तिक आयुष्यातही मोजावी लागली. त्यांच्या पिंपळनेर या मूळ गावी असलेल्या जुन्या विचारांच्या काही नातेवाईकांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला आणि त्यांना भोजनाचे आमंत्रण देणे बंद केले. परंतु या विरोधाने शास्त्रीजी डगमगले नाहीत. सामाजिक सुधारणेच्या आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले.
शास्त्रीजी गांधीजींच्या नैतिक नेतृत्वाचा मनापासून आदर करीत असले, तरी ते त्यांचे अंधानुकरण करणारे नव्हते. त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्याचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रखर आविष्कार १९३४ मध्ये घडलेल्या एका प्रसंगात दिसून आला.
१५ जानेवारी १९३४ रोजी बिहारमध्ये अत्यंत विनाशकारी भूकंप झाला. या भीषण आपत्तीत हजारो निष्पाप लोक मृत्युमुखी पडले. या घटनेवर भाष्य करताना महात्मा गांधींनी हरिजनमध्ये लिहिले की हा भूकंप म्हणजे अस्पृश्यतेचे घोर पाप पाळणाऱ्या हिंदू समाजाला ईश्वराने दिलेला शाप आणि दंड होय.
गांधीजींच्या या विधानामुळे बुद्धिवादी वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला. रवींद्रनाथ टागोरांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. शास्त्रीजींनाही गांधीजींची ही भूमिका अवैज्ञानिक आणि समाजाला मागे नेणारी वाटली. त्यांनी गांधीजींच्या या विधानाला जाहीरपणे आव्हान दिले. शास्त्रीजींच्या मते भूकंप ही संपूर्णतः नैसर्गिक आणि वैज्ञानिक घटना आहे. तिचा संबंध मानवाच्या पाप-पुण्याशी किंवा अस्पृश्यतेसारख्या सामाजिक दोषांशी जोडणे हास्यास्पद आहे. नैसर्गिक आपत्तींना देवाचा कोप ठरवणे म्हणजे सामान्य जनतेला पुन्हा अंधश्रद्धा आणि भीतीच्या गर्तेत लोटण्यासारखे आहे. मानवाच्या मुक्तीचा मार्ग बुद्धिवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच आहे, अशी त्यांची ठाम धारणा होती.
या स्पष्ट आणि तर्कनिष्ठ भूमिकेमुळे गांधीजींच्या अनेक अनुयायांनी शास्त्रीजींवर कडाडून टीका केली. मात्र, ते आपल्या विवेकवादावर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर शेवटपर्यंत ठाम राहिले. या प्रसंगातून गांधीजींविषयी त्यांच्या मनात नितांत आदर असूनही सत्य आणि बुद्धी यांच्याशी तडजोड न करण्याची त्यांची वृत्ती दिसून येते.
१९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात शास्त्रीजींच्या राजकीय विचारांना आणखी एक नवे वळण मिळाले. गांधीजींचा अहिंसावाद आणि काँग्रेसचे मवाळ राजकारण याच्या मर्यादा त्यांना जाणवल्या. जागतिक स्तरावर उदयाला येत असलेल्या फॅसिझम आणि नाझीझमसारख्या हुकूमशाही प्रवृत्तींचा सामना करण्यास हे तंत्र अपुरे आहे, अशी त्यांची धारणा बनू लागली.
याच काळात त्यांचे लक्ष भारताचे क्रांतिकारक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत एम. एन. रॉय यांच्या विचारांकडे वळले. रॉय यांचा वैज्ञानिक ‘मानवतावाद’ आणि ‘जडवाद’ या संकल्पना शास्त्रीजींना आधुनिक आणि पटणाऱ्या वाटल्या.
तथापि, राजकीयदृष्ट्या गांधीवादापासून दूर गेल्यानंतरही गांधीजींच्या अफाट नेतृत्वाबद्दल, त्यांच्या सत्याग्रहाच्या शक्तीबद्दल आणि समाजसुधारणेतील योगदानाबद्दल शास्त्रीजींच्या मनातील आदर कधीही कमी झाला नाही.
शास्त्रीजी आणि महात्मा गांधी यांच्यातील संबंध हा आधुनिक भारताच्या वैचारिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. या नात्यात सहकार्य होते आणि प्रसंगी निर्भीड मतभेदही होते. शास्त्रीजींनी गांधीजींकडे केवळ राजकीय नेता म्हणून पाहिले नाही, तर त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या प्रयत्नांचे महत्त्व ओळखले. दुसरीकडे, गांधीजींनी शास्त्रीजींच्या प्रखर पांडित्याचा आणि सुधारणावादी धार्मिक दृष्टिकोनाचा उपयोग अस्पृश्यतेसारख्या सामाजिक रूढींना आव्हान देण्यासाठी केला.