तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
धर्म म्हणजे काही अपरिवर्तनीय नियमांचा संच नव्हे, तर समाजाला नैतिक दिशा देणारी आणि काळानुसार विकसित होत राहणारी जीवनव्यवस्था होय
१. स्वतंत्र ग्रंथसंपदा
'शुद्धिसर्वस्वम्' (१९३४): धर्मशास्त्रीय आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर भाष्य करणारा हा त्यांचा पहिला प्रकाशित ग्रंथ आहे.
'आनंदमीमांसा' (१९३८): मानवी सुखाचे स्वरूप आणि त्यामागील तत्त्वज्ञानाचे चिंतन मांडणारा ग्रंथ.
'हिंदुधर्माची समीक्षा' (१९४१): हिंदू धर्मातील सामाजिक विषमतेची रचना, इतिहास आणि त्यातील शोषक प्रवृत्तींचे चिकित्सक समाजशास्त्रीय परीक्षण करणारा हा त्यांचा अत्यंत गाजलेला ग्रंथ.
'जडवाद' (१९४१): एम. एन. रॉय यांच्या वैज्ञानिक भौतिकवादाच्या प्रभावातून, समाजातील जुनाट समजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी लिहिलेला एक महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथ.
'ज्योति-निबंध' (१९४७): ज्योतिषशास्त्राच्या मर्यादा आणि संकल्पनांवर प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी दृष्टीने टाकलेला प्रकाश.
'वैदिक संस्कृतीचा विकास' (१९५१): हा शास्त्रीजींचा सर्वश्रेष्ठ आणि अजरामर मानला गेलेला ग्रंथ आहे. या ग्रंथाला मराठी भाषेतील पहिला 'साहित्य अकादमी पुरस्कार' प्राप्त झाला.
'आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धान्त' (१९७३): साहित्याचे प्रयोजन, रससिद्धान्त आणि संस्कृतीशी असणारे साहित्याचे नाते उलगडणारा प्रगल्भ समीक्षा ग्रंथ.
२. संपादित ग्रंथ आणि लेखसंग्रह
'राजवाडे लेखसंग्रह' (१९६४): सुप्रसिद्ध इतिहाससंशोधक वि. का. राजवाडे यांच्या निवडक आणि ऐतिहासिक लेखांचे संपादन.
'लोकमान्य टिळक लेखसंग्रह' (१९६९): लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक लेखांचे संपादन आणि त्याला लिहिलेली विस्तृत प्रस्तावना.
३. महाकाय कोशवाङ्मय (संपादन आणि मुख्य लेखन)
धर्मकोश (संपादन): गुरु स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली वाईच्या प्राज्ञपाठशाळेत सुरू झालेल्या या जागतिक कीर्तीच्या संशोधनप्रकल्पाची संपादकीय धुरा शास्त्रीजींनी आयुष्यभर सांभाळली. यात प्रामुख्याने व्यवहारकांड, उपनिषदकाण्ड, राजनीतिकांड, संस्कारकांड आणि वर्णाश्रमधर्मकांड अशा विविध खंडांतून त्यांनी प्राचीन न्याय, कायदा, समाज आणि संस्कृतीचा ३००० वर्षांचा इतिहास पुराव्यांसह जगासमोर आणला.
'मराठी विश्वकोश' (प्रमुख संपादक आणि वैचारिक नोंदी): मराठी भाषेला आधुनिक ज्ञानभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी वाई येथे विश्वकोशाची उभारणी केली आणि परिभाषा कोशासह अनेक खंड सिद्ध केले. या कोशात शास्त्रीजींनी स्वतः 'जातिसंस्था', 'महाभारत', 'रामायण', 'चार्वाक', 'जैन धर्म', 'बौद्ध धर्म', 'वेदान्त' आणि 'न्यायशास्त्र' या विषयांवर १०० पेक्षा जास्त सुबोध आणि तर्कशुद्ध नोंदी लिहिल्या.
४. ऐतिहासिक भाषांतर आणि अनुवाद
'भारतस्य संविधानम्’ (१९५२): स्वतंत्र भारताचे संविधान स्वीकारल्यानंतर, त्याच्या अधिकृत संस्कृत भाषांतराची धुरा केंद्र सरकारने शास्त्रीजींवर सोपवली. या समितीचे निमंत्रक म्हणून काम करत असताना, संविधानाच्या ३९५ कलमांपैकी कलम १ ते २६३ आणि सर्व दुरुस्ती कलमांचे भाषांतर स्वतः शास्त्रीजींनी अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण केले होते.
जागतिक ग्रंथांचे अनुवाद: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष असताना, त्यांनी जॉन स्ट्युअर्ट मिल, बर्ट्रांड रसेल, जीन-जॅक रुसो, इतिहासकार जदुनाथ सरकार आणि डॉ. पां. वा. काणे यांच्या जागतिक कीर्तीच्या ग्रंथांचे मराठीत अनुवाद करून प्रसिद्ध केले.