तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
धर्म म्हणजे काही अपरिवर्तनीय नियमांचा संच नव्हे, तर समाजाला नैतिक दिशा देणारी आणि काळानुसार विकसित होत राहणारी जीवनव्यवस्था होय
शास्त्रीजींच्या प्रगाढ पांडित्यामुळे, तसेच वाईच्या प्राज्ञपाठशाळेने हाती घेतलेल्या ‘धर्मकोश’ या महत्वपूर्ण कार्यामुळे वाईला राष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली. आधुनिक, तांत्रिक आणि धार्मिक संकल्पना सोप्या आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडण्याची शास्त्रीजींची हातोटी देशातील विद्वानांनी मान्य केली. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारताचे संविधान स्वीकारल्यानंतर त्याच्या अधिकृत संस्कृत भाषांतराची जबाबदारी केंद्र सरकारने शास्त्रीजींवर सोपविली.
भारताच्या घटनासभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वतंत्र भारताचे संविधान अधिकृतरीत्या स्वीकारले. नव्या लोकशाही प्रजासत्ताकाची पायाभरणी करणाऱ्या या संविधानात त्यावेळी देशातील चौदा प्रमुख प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली होती. मात्र भारताचा बौद्धिक आणि सांस्कृतिक वारसा ज्या संस्कृत भाषेत जतन झाला आहे, त्या संस्कृतमध्येही संविधानाचा अधिकृत अनुवाद असावा, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर या भाषांतराची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, हा प्रश्न निर्माण झाला.
इंग्रजीतील पाश्चात्य राजकीय, लोकशाही आणि कायदेशीर संकल्पनांचे प्राचीन संस्कृत भाषेत रूपांतर करणे हे केवळ एका भाषेतून दुसऱ्या भाषेत शब्दांचे भाषांतर करणे नव्हते. नव्या संकल्पनांना संस्कृत भाषेत योग्य प्रतिशब्द निर्माण करण्याचे ते अत्यंत महत्त्वाचे कार्य होते.
इंग्रजीतील क्लिष्ट तांत्रिक आणि कायदेशीर संज्ञांना संस्कृतच्या अभिजात चौकटीत बसवणे हे मोठे आव्हान होते. अशा वेळी या कार्यासाठी ज्या विद्वानाचे नाव सर्वप्रथम पुढे आले, ते म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. केंद्रीय कायदेमंडळ आणि संसदेच्या संमतीने हे महत्त्वाचे आणि अत्यंत अवघड मानले गेलेले कार्य वाईच्या प्राज्ञपाठशाळामंडळाकडे आले. याचे दुसरे कारण म्हणजे, अशा वैचारिक कार्यासाठी आवश्यक असलेले समृद्ध संदर्भग्रंथालय, आणि पूरक शैक्षणिक वातावरण वाईत आधीच उपलब्ध होते.
संविधानाच्या अधिकृत भाषांतरासारखे राष्ट्रीय स्तरावरील कार्य केवळ एका विद्वानाच्या वैयक्तिक मतावर सोडून चालणार नव्हते. म्हणून लोकसभा सभापतींनी संविधानाच्या संस्कृत भाषांतरासाठी देशातील सर्वोच्च कायदेतज्ज्ञ आणि संस्कृत पंडितांची एक उच्चाधिकार समिती नियुक्त केली. या समितीत देशातील प्रतिष्ठित विद्वानांचा समावेश करण्यात आला.
समितीचे सभापती म्हणून महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे, यांची निवड झाली. ते एक सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ होते. त्यांनी लिहिलेल्या ‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ या ग्रंथाला सर्वमान्यता मिळाली होती. पुढे त्यांना भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. प्रमुख भाषांतरकार व समितीचे निमंत्रक म्हणून शास्त्रीजींनी निवड झाली. त्याचबरोबर बनारसचे डॉ. मंगलदेवशास्त्री यांचीही भाषांतरकार म्हणून निवड झाली.
याशिवाय समितीमध्ये इतर आठ विद्वानांची निवड करण्यात आली. त्यामध्ये डॉ. सुनीतीकुमार चॅटर्जी, श्री. के. बालसुब्रह्मण्यम् अय्यर, महामहोपाध्याय गिरिधरशर्मा चतुर्वेदी, डॉ. बाबूराम सक्सेना, पंडित राहुल सांकृत्यायन, डॉ. रघुवीर, मुनि जिनविजयजी आणि डॉ. कुन्हन राजा या विद्वानांचा समावेश होता.
अफाट पसारा असलेल्या संविधानातील ३९५ कलमांचे भाषांतर वेळेत आणि निर्दोषपणे पूर्ण करण्यासाठी शास्त्रीजी आणि डॉ. मंगलदेवशास्त्री यांनी कामाची विभागणी केली. कलम १ ते २६३ तसेच संविधानातील सर्व दुरुस्ती कलमांचे भाषांतर शास्त्रीजींनी केले. कलम २६४ ते ३९५ या उर्वरित कलमांचे भाषांतर डॉ. मंगलदेवशास्त्री यांनी पूर्ण केले.
संविधानाच्या भाषांतराचे काम वाई येथील प्राज्ञपाठशाळेच्या मठात आणि तेथील समृद्ध संदर्भग्रंथालयाच्या शांत वातावरणात पार पडले. प्राज्ञपाठशाळेच्या ग्रंथसंपदेत विविध संदर्भग्रंथ आणि हस्तलिखिते आधीपासून उपलब्ध असल्यामुळे या कार्याला गती मिळाली. विशेष गौरवाची बाब म्हणजे, अत्यंत अवघड आणि क्लिष्ट मानले गेलेले संविधानाचे हे संस्कृत भाषांतर या विद्वानांच्या परिश्रमामुळे अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण झाले.
भाषांतराचा प्राथमिक मसुदा तयार झाल्यानंतर तपासणी समितीचे सर्व सदस्य वाईला एकत्र जमले. या विद्वानांच्या समितीने वाईत सलग २१ दिवस बैठका घेतल्या. या काळात सदस्यांनी दररोज तासनतास बसून संविधानातील प्रत्येक कलमाचे अत्यंत बारकाईने वाचन केले. इंग्रजी मूळ मसुद्याशी त्याची तुलना करण्यात आली आणि आवश्यक त्या दुरुस्त्या सुचविण्यात आल्या. भाषांतरित मसुद्यातील कायदेशीर परिभाषेची काटेकोर तपासणी करण्यात आली. या सर्व दुरुस्त्यांसह तयार झालेला अंतिम मसुदा लोकसभा सभापतींकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. लोकसभेने या मसुद्याला मान्यता दिल्यानंतर अधिकृत संस्कृत आवृत्ती देशासमोर आली.
संविधानाचे हे भाषांतर केवळ पंडिती थाटाचे नसावे आणि सामान्य जनतेला ते दुर्बोध ठरू नये, यावर शास्त्रीजींचा विशेष कटाक्ष होता. संस्कृतचे थोडेफार सामान्य ज्ञान असलेल्या कोणत्याही व्यक्तीला संविधानाचा कायदेशीर अर्थ सहजपणे समजावा, या हेतूने शास्त्रीजींनी अत्यंत सुलभ आणि प्रवाही भाषेत संविधानाचे भाषांतर केले.
या भाषांतराची गुणवत्ता आणि दर्जा तपासण्यासाठी पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. मुकुंदराव जयकर आणि पुण्याच्या लॉ कॉलेजचे प्रसिद्ध प्राचार्य नानासाहेब घारपुरे यांनी इंग्रजी घटनेतील काही अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची कलमे निवडून त्यांच्या संस्कृत भाषांतराशी प्रत्यक्ष ताडून पाहिले. इंग्रजीतील क्लिष्ट कायदेशीर आणि संसदीय संज्ञांसाठी अत्यंत समर्पक आणि सोपे संस्कृत प्रतिशब्द वापरण्यात आल्याचे पाहून या दोन्ही कायदेतज्ञांनी समाधान व्यक्त केले. संविधानाचे सार संस्कृत भाषेत जिवंतपणे उतरविल्याबद्दल त्यांनी शास्त्रीजींचे विशेष अभिनंदन केले.
संविधानाच्या मुद्रणाचा मानही वाईलाच मिळाला. संस्कृत घटनेच्या भाषांतराची पहिली अधिकृत आवृत्ती १९५२ साली वाई येथील ‘प्राज्ञपाठशाळा मुद्रणालयात’ अत्यंत देखण्या स्वरूपात मुद्रित करण्यात आली.
शास्त्रीजींच्या आणि प्राज्ञपाठशाळेच्या सामूहिक वैचारिक प्रयत्नांतून साकारलेला हा उपक्रम वाईच्या इतिहासातच नव्हे, तर भारतीय बौद्धिक इतिहासातही महत्वाचा ठरला.