तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
तर्कतीर्थ
लक्ष्मणशास्त्री जोशी
धर्म म्हणजे काही अपरिवर्तनीय नियमांचा संच नव्हे, तर समाजाला नैतिक दिशा देणारी आणि काळानुसार विकसित होत राहणारी जीवनव्यवस्था होय
महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात, पांझरा नदीच्या सुपीक खोऱ्यात वसलेले पिंपळनेर हे एक शांत, टुमदार गाव. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजेच १९०१ च्या सुमारास, या गावाची लोकसंख्या अवघी तीन हजारांच्या आसपास होती. गावचे जीवन प्रामुख्याने शेतीभोवती फिरणारे आणि पारंपरिक होते. बागायती शेती करणारे कष्टकरी, वाणी-तांबोळी आणि लहान-मोठे व्यापारी असा येथील समाज होता. ब्राह्मण कुटुंबे बोटावर मोजण्याइतकीच होती. बहुजन समाज अत्यंत श्रद्धाळू आणि धर्माभिमानी असल्यामुळे गावात ब्राह्मणांना मोठा मान होता. रस्त्याने एखादा ब्राह्मण दिसला की शेतकरी असो वा व्यापारी, तो नम्रपणे "पाय लागो महाराज" असे म्हणत आदरपूर्वक अभिवादन करत असे.
अशा या धार्मिक आणि पारंपरिक वातावरणात राहणाऱ्या वाजपेयी ब्राह्मण कुटुंबात २७ जानेवारी १९०१ रोजी लक्ष्मणचा जन्म झाला. तो आपल्या माता-पित्यांचे दहावे अपत्य होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह भिक्षुकी आणि पूजापाठ यावर अवलंबून होता. चातुर्मास, कुळाचार, सत्यनारायण पूजा, श्राद्ध यांसारख्या धार्मिक विधींसाठी बाळाजी कृष्ण जोशी यांना पाचारण केले जाई. या विधींच्या मानधनावरच कुटुंबाचा चरितार्थ चालत असे. बाळाजी कृष्ण जोशी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला समाजात मानाचे स्थान होते. ऊस गाळण्याचा हंगाम सुरू झाला की गावातील श्रद्धाळू शेतकरी आणि व्यापारी त्यांच्या घरी न चुकता ताज्या गुळाच्या ढेपी पाठवत असत.
लक्ष्मण अवघा तीन वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. त्यामुळे आईची आठवणही त्याच्या मनात राहिली नव्हती. अशा कठीण प्रसंगी आईची माया आणि प्रेम देण्याची जबाबदारी त्याची थोरली बहीण त्रिवेणी हिने स्वतःवर घेतली. लक्ष्मण तिला प्रेमाने 'माई' म्हणत असे. माई त्याच्यापेक्षा तब्बल बावीस वर्षांनी मोठी होती. तिच्या स्वतःच्यावरही दुःखाचा मोठा आघात झाला होता. विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच तिच्या पतीचे निधन झाले आणि ती विधवा होऊन माहेरी परतली. पण स्वतःचे दुःख बाजूला ठेवून तिने वडील बाळाजी कृष्ण आणि वेणीमाधव आणि लक्ष्मण या दोन धाकट्या भावांचा आईच्या मायेने सांभाळ केला. त्यांच्या संगोपनात आणि जडणघडणीत तिने स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले.
लक्ष्मणचे वडील बाळाजी कृष्ण जोशी हे वेदशास्त्रसंपन्न होते. मात्र, त्यांच्या आयुष्यात एकामागून एक अनेक दुःखद प्रसंग आले. विविध साथीच्या रोगांत त्यांची अनेक मुले दगावली आणि त्यानंतर पत्नीचेही अकाली निधन झाले. या सततच्या आघातांमुळे त्यांचा स्वभाव वैराग्यशील आणि गंभीर झाला. घरात वडिलांची ही विरक्त वृत्ती असली तरी माई मात्र अगदी विरुद्ध स्वभावाची होती. ती उत्साही होती. तिने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली आणि घराला मायेची ऊब दिली.
बालपणी लक्ष्मण सतत माईच्या मागे-मागे फिरत असे. संध्याकाळी माई आणि तिच्या मैत्रिणी घरापासून थोड्या अंतरावर गप्पा मारण्यासाठी जमत. लक्ष्मण जवळच खेळत असे. पण त्याचे कान मात्र त्यांच्या गप्पांकडेच लागलेले असत. त्या गप्पांमध्ये अमुक झाडावर भूत वसते, कोणाच्या अंगात भूत संचारते अशा सुरस आणि अंगावर शहारे आणणाऱ्या कथा रंगत. त्या गोष्टी ऐकताना लहानग्या लक्ष्मणची चांगलीच गाळण उडत असे. रात्री दोरीला टांगलेल्या कंदिलाच्या हलणाऱ्या सावल्या भिंतीवर पडल्या की त्याला भीतीने घाम फुटे. कधी माईच्या मैत्रिणी त्याच्या या भीतीची थट्टाही करत. मग तो घाबरून धावत माईच्या कुशीत जाऊन लपत असे.
लक्ष्मणच्या घरात नवरात्र, पितृपंधरवडा, व्रतवैकल्ये यांसारखे सर्व धार्मिक नियम काटेकोरपणे पाळले जात. त्या वेळी स्वयंपाकघरात सोवळ्याचे कडक नियम असत. सोवळ्याचा स्वयंपाक करण्याचा अधिकार केवळ सौभाग्यवती स्त्रियांनाच होता. विधवा स्त्रियांना स्वयंपाकघरात प्रवेश नव्हता. घरात दुसरी कोणतीही स्त्री नसल्यामुळे कौटुंबिक विधी सुरळीत पार पाडता यावेत म्हणून माईला जड अंतःकरणाने केशवपन करावे लागले. लक्ष्मणने तिला त्या अवस्थेत प्रथम पाहिले, तेव्हा तो अक्षरशः हादरून गेला. पण माईने प्रेमाने त्याची समजूत काढली. त्या एका बदलाने तिच्याविषयीचा घरातील मान आणि प्रेम मात्र कणभरही कमी झाले नाही.
लक्ष्मणचे बालपण काही जिवलग मित्रांच्या सहवासात आनंदात गेले. रामदास नथू वैद्य, शंकर बाबासाहेब देशमुख आणि दादा करमरकर हे त्याचे खास मित्र होते. या मित्रांसोबत तो गावाजवळून वाहणाऱ्या पांझरा नदीत तासनतास पोहत असे. संध्याकाळी रामदास वैद्य याच्या घराच्या अंगणातील आखाड्यात कुस्ती खेळणे हा त्यांचा आवडता छंद होता. या खेळांमुळे लक्ष्मणची शरीरयष्टी मजबूत झाली.
लक्ष्मण शाळेत जाऊ लागला. ज्ञानाची ओढ त्याला लहानपणापासूनच होती. पण चाकोरीबद्ध शिक्षणात त्याचे मन फार काळ रमले नाही. मात्र वडिलांनी घरीच त्याला वाचन-लेखनाचे प्राथमिक शिक्षण दिले. अमरकोश, शिवलीलामृत, हरिविजय, तुकारामांचे अभंग आणि विविध सुभाषितांचा परिचय त्याला बालपणीच झाला. वडिलांनी त्याला रामायण, महाभारत आणि संतचरित्रे वाचण्याची आवड लावली. शाळेत गणित आणि तोंडी हिशेब या विषयांत त्याला चांगली गती होती. शिक्षकांनी प्रश्न सोडवायला दिला की गणित पूर्ण करून सर्वप्रथम पाटी खाली ठेवणारा विद्यार्थी बहुधा लक्ष्मणच असे.
लक्ष्मणच्या नवव्या वर्षी त्याची मुंज करण्याचे ठरले. खरं तर ती आठव्या वर्षीच होणार होती. परंतु त्याच्या एका भावाचे न्यूमोनियाने निधन झाल्यामुळे मुंज एक वर्ष पुढे ढकलावी लागली. अखेर नवव्या वर्षी त्याची मुंज पार पडली. मात्र लक्ष्मणच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात अजून बाकी होता. मुंज झाल्यानंतर काहीच दिवसांत कॉलऱ्याच्या साथीमध्ये त्याची लाडकी बहीण माई हिचे निधन झाले. ज्या बहिणीने आईची माया देत त्याचे संगोपन केले होते, तीच अचानक कायमची निघून गेली. या धक्क्याने लक्ष्मण पूर्णपणे पोरका झाला. घरभर उदासी पसरली. वडिलांच्या मनातील वैराग्य आणखी वाढले. ते अधिक अबोल आणि गंभीर बनले.
वडील त्याला कर्मकांडाच्या विधींसाठी आणि पूजाअर्चेसाठी आपल्याबरोबर विविध ठिकाणी घेऊन जाऊ लागले. अशा वेळी मिष्टान्न भोजनाची मेजवानी मिळे; पण माईच्या आठवणीने ते जेवणही लक्ष्मणला गोड वाटत नसे. आई आणि माई यांच्या निधनानंतर वडिलांनी स्वतः भाकरी करायला शिकून मुलांना गरम जेवण मिळेल याची काळजी घेतली. घरच्या जोडलेल्या गायीमुळे दूध आणि तुपाचीही सोय होती.
माईच्या जाण्याने घरातील मायेचा आधारच हरपला. त्यामुळे लक्ष्मणचे मन घरात रमेना. तो सतत अस्वस्थ राहू लागला. ज्ञानाची तीव्र ओढ असूनही शाळेतील चाकोरीबद्ध शिक्षणात त्याचे मन लागत नव्हते. त्यातच घरावर ओढवलेल्या दुःखांच्या मालिकेमुळे त्याने पिंपळनेर सोडून दूर जाऊन शिक्षण घेण्याचा निश्चय केला. हा विचार त्याने मित्रांजवळ बोलून दाखवला. तेव्हा काही मित्रांनी, "अरे, असे भलतेसलते बोलू नकोस," असे म्हणत त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तर काही मित्रांनी "जरूर जा. दूर गेलास तर तुझे भाग्य तुझ्या पाठीशी उभे राहील," असे सांगत त्याला धीर दिला. वडिलांनाही हे जाणवू लागले होते की लक्ष्मण आता पिंपळनेरमध्ये फार काळ राहणार नाही.
त्याच सुमारास पिंपळनेरच्या वनविभागात देवकुळे नावाचे नवे वनाधिकारी रुजू झाले. ते आध्यात्मिक वृत्तीचे होते. बाळाजी कृष्ण जोशी यांच्याशी त्यांची लवकरच मैत्री झाली. दोघांच्या नियमित भेटीगाठी होऊ लागल्या. एकदा बोलता बोलता बाळाजी कृष्ण म्हणाले, "मला लक्ष्मणला चांगल्या गुरुकुलात शिक्षणासाठी हरिद्वारला पाठवायचे आहे."
त्यावर देवकुळे यांनी सल्ला दिला, "हरिद्वार खूप दूर आहे. त्याऐवजी त्याला वाई येथील प्राज्ञपाठशाळेत पाठवा. तेथे नारायणशास्त्री मराठे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देतात आणि त्यांची प्रेमाने काळजीही घेतात."
देवकुळे यांचा हा सल्ला बाळाजी कृष्ण यांना मनापासून पटला. हरिद्वारऐवजी लक्ष्मणला वाईच्या प्राज्ञपाठशाळेत पाठविण्याचे ठरले. त्या वेळी लक्ष्मणचे वय अवघे बारा-तेरा वर्षांचे होते. फेब्रुवारी १९१४ मध्ये तो वडिलांसोबत वाईला आला. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा नदीवर स्नान करून नित्यकर्म आटोपल्यावर ते गुरुजींच्या मठात गेले. गुरुजींना पाहताच लक्ष्मणने साष्टांग दंडवत घातला. गुरुजींनी प्रेमाने त्याची विचारपूस केली आणि हसतमुखाने त्याचे स्वागत केले. त्यांच्या त्या प्रसन्न, आश्वासक चेहऱ्याकडे पाहताच, ‘आपण योग्य ठिकाणी आलो आहोत’ असा लक्ष्मणच्या मनात विश्वास जागा झाला. अशा प्रकारे वाई येथे त्याच्या आयुष्यातील एका तेजस्वी आणि नव्या पर्वाची सुरुवात झाली.